Breaking News

कोरोना, लॉकडाऊनमुळे आदिवासींची परवड

रानमेवा विकून चरितार्थ चालविणे झाले कठीण    

राज्य शासनाकडून अनुदान मिळण्याची अपेक्षा

उरण : वार्ताहर

उन्हाळा सुरू झाला की बाजारात रानमेवा दाखल होतो. औषधी गुणधर्म असलेला हा रानमेवा नागरिक आदिवासी बांधवांकडून खरेदी करतात, मात्र वाढत्या कोरोनामुळे लादलेल्या कडक निर्बंधांचा फटका या आदिवासी बांधवांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे यंदा बाजारात रानमेवा दाखल झालेला नाही. त्यामुळे आदिवासींचा रोजगार

पूर्णपणे ठप्प झालेला आहे. त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण बनले आहे. राज्य सरकारने आदिवासींना अनुदान द्यावे, अशी मागणी आदिवासींकडून होत आहे.

कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढत थैमान माजवायला सुरुवात केली. रोज वाढणारे संक्रमित रुग्णांचे आकडे यामुळे राज्य शासनाला पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे लागले. त्यात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी 7 ते 11 अशी वेळ दिली गेली, मात्र जंगल, डोंगरदर्‍या पालथ्या घालत बाजाराला पोटाची खळगी भरायला येणार्‍या आदिवासींसाठी ही वेळ बेताची ठरत आहे. उरण बाजारपेठेत जंगलातून मिळेल ते कंदमुळे, पालेभाजी आणून विकतो. कंदमुळांचा वाटा  60 रुपये व शेवळी जुडी 50 रुपयास तीन अशा दराने आम्ही विकतो, असे आदिवासी महिलाने सांगितले.

आदिवासी उरण तालुक्यातून उरण बाजारपेठेत येत असतात  बाजारपेठेतील महाराष्ट्र स्वीट जवळ, गांधी चौक, राजपाल नाका, आनंद नगर आदी ठिकाणी बसून कंदमुळे, भाजीपाला आदी विकतांना दिसत आहेत. आदिवासी, कातकरी दुर्गम भागात राहत असल्याने मिळेल ते काम करायचे आणि कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. महिलादेखील दिवसभर कष्ट करतात. जंगलात मिळणारा रानमेवा जसे की शेवळी, कंदमुळे, आळू, जांभुळ, शेतात पिकवलेल्या गावठी भाज्या, करवंद असे बाजाराला विकायचे आणि मिळालेले दोन पैशात घर चालवायचे, असे जीवन जगत आहेत. राज्य सरकारकडून आदिवासींना आर्थिक मदत मिळाली तर आदिवासींना चरितार्थ भागवता येईल.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यामुळे वाढणारी कोरोना संक्रमित रुग्णसंख्या यामुळे शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. लॉकडाऊन असला तरी सकाळी 7 ते 11 ही वेळ जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी व विक्रीसाठी दिली आहे. ही वेळ आदिवासींनी पाळायची म्हटली तर त्यांच्यासाठी हे मोठे दिव्य आहे.

आम्ही गावठी भाजी आणतो, पण येईपर्यंत उशीर झाला की भाजी विकली जात नाही. एकतर लांबून यावे लागत. त्यात भाजी पण शिल्लक राहते. एवढी मेहनत करून पिकवलेली भाजी डोळ्यादेखत सुकून गेल्याने डोळ्यात पाणी येते.

-सगुणाबाई कातकरी, मोठी जुई, चिरनेर, उरण

कोरोना महामारीमुळे लोकांना रोजगार उद्योग धंदे नाहीत. त्यामुळे सर्व सामान्य संपुर्ण होरपळून निघाले आहेच, परंतु त्याबरोबर आदिवासी बांधव जे मौसमी फळे रानमेवा, भाजी विकून उदरनिर्वाह करतात त्यांना लॉकडाऊनमुळे व्यवसाय करता येत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाकडून आदिवासींना अनुदान द्यावे.

-नरेंद्र भगत, सामाजिक कार्यकर्ते, भेंडखळ, उरण

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply