पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना महामारीमुळे सर्व जण मेटाकुटीस आले आहेत. कोरोनाची दुसरी लाट आणि लादण्यात आलेले निर्बंध यामुळे असंख्य नागरिकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. बेरोजगारीमुळे चोरी, लुटमार, लुबाडणूक अशा अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना वाढत असलेल्या दिसत आहे. पनवेल परिसरात यामध्ये कामोठे, खारघर, नवीन पनवेल, कळंबोली आदी ठिकाणी मध्यंतरीच्या काळात थोडे कमी झालेले चोर्यामार्यांचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागले आहे.
यामध्ये कामोठे वसाहतीमध्ये एका बंद घड्याळाच्या दुकानासह फूड मॅजिक दुकानात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून मोठ्या प्रमाणात विविध कंपनीची घड्याळे व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला आहे. सविस्तर घटना अशी की, कामोठे वसाहतीमधील सेक्टर 21 प्रथम हेरीटेज शॉप नं.17 या ठिकाणी आर्ट वॉच या नावाचे दुकान नौशाद यांचे असून हे दुकान बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने शटरच्या कुलूपाचा कोयंडा कोणत्यातरी हत्याराने तोडून शटर उघडून आत प्रवेश केला. शोरुममधील विविध नामांकित कंपन्यांची घड्याळे, रोख रक्कम तसेच शेजारील फुड मॅजिक दुकानातील रोख रक्कम असा मिळून जवळपास 26 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कामोठे येथेचे जाणार्या रोडच्या बाजूला मार्केट यार्ड जवळ उभी करून ठेवलेली अॅक्टीव्हा दुचाकीची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना घडली आहे. सतेंद्र सोनकर यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची पांढर्या रंगाची अॅक्टीव्हा (एमएच-46-एके-9437) उभी करून ठेवली होती. या वेळी अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेल्याने याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
नवीन पनवेल परिसरात एका वृद्ध व्यक्तीस मारहाण करून त्यांच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम असा मिळून जवळपास एक लाख 20 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. नवीन पनवेल सेक्टर 13 येथे राहणारे त्रंबक दहातोंडे (वय 85) यांचे दुमजली घर असून वर त्यांचे कुटुंबिय राहतात. त्यांच्या खालील बाजूस असलेल्या एका गाळ्यामध्ये ते स्वतः झोपतात. अज्ञात दोघा चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या गाळ्यात घुसून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील दागिने व रोख रक्कम असा मिळून जवळपास एक लाख 20 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबतची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
दरम्यान खारघर वसाहतीत लसीकरणासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरातील रोखरक्कम, दागिने असा मिळून जवळपास 70 हजारांचा ऐवज चोरून नेला.
पोलिसांकडून आवाहन
कोरोना महामारीत लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार गेले. जलदरित्या पैसे मिळविण्यासाठी चोरी, लूटमार करणार्यांचे प्रमाण वाढले. गेल्या काही दिवसांत पनवेल परिसरात पुन्हा चोरीच्या घटना घडत आहे. या चोरांना पकडणे पोलिसांसमोर आव्हान असले तरी पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी यासंदर्भात नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.