Breaking News

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची घोषणा ‘दिबां’च्या नावासाठी आता व्यापक लढा!

10 जूनला मानवी साखळी तर 24 जूनला सिडको भवनावर धडक

पनवेल : दीपक म्हात्रे
प्रकल्पग्रस्त, शेतकरी, शेतमजूर आणि ओबीसी समाजाचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी सुरू झालेली चळवळ आता जिल्ह्या-जिल्ह्यांत पसरत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक, प्रकल्पग्रस्त आणि शेतकर्यांच्या संघटना एकत्र येऊन हा लढा आता व्यापक प्रमाणात होत आहे. येत्या 10 तारखेला अखिल आगरी समाज परिषदेचे संस्थापक जी. एल. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकत्र जमून शपथ घेऊन आंदोलनाचे रणशिंग फुंकण्याचा निर्धार रविवारी (दि. 23) झालेल्या सर्वपक्षीय नेते आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांच्या बैठकीत कृती समितीने केला. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याच्या आंदोलनाची रणनीती ठरविण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची बैठक पनवेल-उरण आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्या वेळी हा निर्धार सर्वांनी जाहीर केला. आपली मागणी शासनाच्या कानी घालण्यासाठी 10 जून रोजी पनवेल, उरण, नवी मुंबई, ठाणे, भाईंदर, वसई, विरार, डहाणू, कल्याण, अंबरनाथ, डोंबिवली, बदलापूर, उल्हासनगर आदी ठिकाणी मानवी साखळी तयार करून शासनाचे लक्ष वेधण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. तत्पूर्वी मुख्यमंत्री, सर्व पक्षांचे प्रमुख नेते यांना यासंबंधीचे निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचे सर्वानुमते ठरले. याचबरोबर येत्या 24 जून रोजी ‘दिबां’च्या स्मृतिदिनानिमित्त हा लढा व्यापक करावा, तसेच लोकभावना पायदळी तुडवून सिडकोने केलेल्या कृतीचा निषेध करण्यासाठी सिडको भवनाला हजारोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकर्यांचा घेराव घालावा, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी खासदार जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, उद्योजक जे. एम. म्हात्रे, उपमहापौर जगदिश गायकवाड, कार्यकारिणी सदस्य जे. डी. तांडेल, मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, सरचिटणीस भूषण पाटील, सहचिटणीस दीपक म्हात्रे, सुरेश पाटील, भाजप नेते दशरथ भगत, साई संस्थानचे विश्वस्त रवी पाटील, नवी मुंबईतील 95 गाव संघर्ष समितीचे दीपक पाटील, आगरी-कोळी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील, डोंबिवलीच्या 27 गाव संघर्ष समितीचे गुलाब वझे, संतोष केणे, अॅलड. मनोज भुजबळ, कामगार नेते सुरेश पाटील, जासईचे मेघनाथ म्हात्रे, राजेश गायकर, विनोद म्हात्रे, जितेंद्र घरत, आगरी समाज विकास संघाचे अध्यक्ष धीरज कालेकर, दिवा मच्छीमार संघटनेचे चंदू पाटील, सागरी जमीन हक्क परिषदेचे अध्यक्ष जयेश आकरे, तसेच नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांतील विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply