Breaking News

कर्जतमध्ये राष्ट्रवादी, शिवसेनेत खडाखडी; हुकूमशाही खपवून घेणार नाही -सुरेश लाड; प्रशासकीय भवन कामाचे दोन वेळा भूमीपूजन

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी

शासनाच्या निधींमधून होणारी विकासकामे पक्षाचे लेबल लावून आणि स्वतःच्या नावावर खपवून घेण्याचे प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस सहन करणार नाही. यापुढे या हुकूमशाहीला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड यांनी गुरूवारी (दि. 27) शिवसेनेला दिला. कर्जतमध्ये प्रशासकीय भवन उभारण्याच्या कामाला मंजूरी मिळाली आहे. या कामाचे गुरुवारी (दि. 27) भूमिपूजन करण्याचा घाट शिवसेनेचे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे घातला होता. मात्र तत्पुर्वी सकाळी राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांनी या कामाचे भूमिपूजन केले. त्या वेळी लाड यांनी आमदार थोरवे यांच्यावर नाव न घेता तोफ डागली. कर्जत येथील प्रशासकीय भवनासाठी आपण आमदार असताना जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता आणि नंतर रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करीत होतो. त्यानंतर 2017 मध्ये राज्य शासनाने या कामाला निधी मंजूर केला होता. मात्र आर्थिक स्थिती बेताची असल्याने शासनाने कामे थांबवून ठेवले होते. शासनाने  निधी दिला असल्याने पक्षाचे लेबल लावून आणि स्वतःच्या नावावर हे काम कुणी खपवून घेऊ नये, अशी तंबी लाड यांनी या वेळी दिली. कर्जत प्रशासकीय भवन इमारतीसाठी विद्यमान आमदारांचे काय प्रयत्न आहेत? असा प्रश्न उपस्थित करुन सुरेश लाड यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. रा.जि.प. उपाध्यक्ष सुधाकर घारे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश टोकरे, जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण, तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव, माजी नगराध्यक्ष शरद लाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या वेळी कर्जतच्या पोलीस मैदानात उपस्थित होते.

दादागिरी आमची नाही तुमची -महेंद्र थोरवे

कर्जत : बातमीदार

कोविडची परिस्थिती असल्याने आपल्याला भूमिपूजनाचा मोठा कार्यक्रम घेता आला नाही. मात्र माजी आमदारांनी घाणेरडी कृती करून आघाडीचा धर्म पाळला नाही. पालकमंत्री येथे विकास कामात खोडा आणत आहेत आणि हे असेच सुरू राहिल्यास त्यांचे पालकमंत्री पददेखील कदाचित राहणार नाही, असा इशारा कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीला दिला. प्रशासकीय भवनाच्या कामाचे भूमिपूजन सकाळी राष्ट्रवादीने केल्यानंतर शिवसेना आमदार थोरवे यांनी त्याच ठिकाणी पुन्हा भूमिपूजन केले. त्या वेळी आमदार थोरवे बोलत होते. तुम्ही हुकूमशाही केली म्हणून जनतेने मला आमदार केले आहे, दादागिरी आम्ही नाही, तुम्ही करता, असा आरोप महेंद्र थोरवे यांनी या वेळी केला.  यावेळी महिला आघाडी जिल्हा संघटक रेखा ठाकरे, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, संघटक संतोष भोईर, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply