पाली : प्रतिनिधी
ऐतिहासिक महत्व असलेल्या सुधागड किल्ल्यावर येणार्या दुर्गप्रेमींची तहान भागावी, त्यांना स्वच्छ व थंड पाणी मिळावे या उद्देशाने बा रायगड परिवार या संस्थे तर्फे किल्ल्यावर नुकतीच श्रमदान मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत किल्ले सुधागडावरील पाणवठ्यातील गाळ व कचरा काढून ते स्वच्छ करण्यात आले. त्यामुळे गडावर जाणार्यांना मुबलक पाणी मिळणार आहे. सुधागडावरील पाणवठे स्वच्छ करणे, त्यातील गाळ व कचरा काढून हे पाणवठे जिवंत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, असे मानून संस्थे तर्फे मोहीम श्रमदान राबविली गेली. गडावरील टाक्यांतील पाणी काढून त्यातील गाळ काढण्यात आला. कोरोनाविषयक नियम पाळत संस्थेच्या सभासदांनी ही मोहीम फत्ते केली. या मोहिमेत बा रायगड परिवार या संस्थेचे वैभव खाटपे, मोहन जाधव, प्रतिक इंदुलकर, निनाद सावंत, दत्तात्रेय सावंत, शुभम काटकर, दत्ता भोसले, तेजस वडके, रुपेश जवके, अमोल सुर्वे व याज्ञिल सावंत आदी सभासद सहभागी झाले होते.