रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 45 दिवसांवर
अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात कोरोनारुग्णवाढीचा दर कमी होऊ लागला आहे. 19 ते 25 मे या आठ दिवसांत रुग्णवाढीचा वेग 18.69 टक्के होता. 27 मे रोजी रुग्णवाढीचा दर 15.65 टक्क्यांवर आला आहे. ही रायगडकरांसाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या एक लाख 28 हजार 552 वर पोहचली आहे. तर एक लाख 18 हजार 655 रुग्ण बरे झाले आहेत. तीन हजार 40 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या सहा हजार 857 कोरोना रुग्ण आहेत.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत रायगड जिल्ह्यात एप्रिल महिन्यात रुग्णवाढीचा वेग कमालीचा वाढला होता. 27 एप्रिल रोजी एका दिवासात 30 टक्के रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला होता. हा दर सर्वाधीक होता. त्यानंतर तो हळूहळू कमी हाऊ लागला. 28 एपिल ते 4 मे या आठवड्यात रुग्णवाढीचा दर 25.1 टक्के होता. त्यानंतर 19 ते 25 मे या आठ दिवसात हा वेग 18.69 टक्क्यांवर आला. 7 मे रोजी रुग्णवाढीचा दर 15.65 टक्के इतका होता. म्हणजेच एका महिन्यात रुग्ण वाढीचा दर निम्म्याने कमी झाला. जिल्ह्यात मृत्यूदर 2.36 टक्के इतका आहे. जिल्ह्यात कोरोना दुपटीचा कालावधी 45 दिवसांवर पोहचला आहे.
रायगड जिल्ह्यात कोरोना सकारात्मक रूग्णांची संख्या आता हळूहळू कमी होऊ लागली आहे. 27 मे रोजी 566 नवीन रुग्ण आढळले होते. तर 693 रुग्ण बरे झाले. एकूण रुग्णांची संख्या एक लाख 28 हजार 552 वर पोहचली आहे. त्यापैकी एक लाख 18 हजार 655 रुग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या सहा हजार 857 कोरोना रुग्ण आहेत. 27 मे रोजी 23 जणांचा मृत्यू झाला. कोरोना काळात मृत्यू पावलेल्यांची संख्या तीन हजार 40 झाली आहे.
मागील वर्षभरात 27 मेपर्यंत रायगड जिल्ह्यात सात लाख आठ हजार 880 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी 31 मार्चपर्यंत चार लाख आठ हजार 839 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. 1 एप्रिल ते 27 मे या कालावधीत तीन लाख चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी 56 हजार 100 जणांचे अहवाल कोरोना सकारात्मक आले. 27 एप्रिल रोजी सर्वाधिक 30 टक्के रुग्ण सकारात्मक आढळले होते. एप्रिल महिन्याची सुरुवात आणि मे महिन्याचा दूसरा आठवडा या कालावधीत रुग्णवाढ वेगात झाली. त्यांनर रुग्णवाढीचा वेग हळूहळू कमी झाला आहे.