Breaking News

कार्यकर्त्यांच्या अपार मेहनतीचे हे यश -आ. रवींद्र पाटील यांचे प्रतिपादन

पाली ः प्रतिनिधी

शिवसेना, भाजप, रिपाइं महायुतीची ताकत व तळागळातील कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अपार मेहनतीचे हे यश असल्याचे प्रतिपादन पेण, सुधागड, रोहा मतदारसंघात भरघोस मतांनी विजयी झालेले महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी केले. जनतेने दाखविलेला विश्वास कायम सार्थकी ठरविणार असून जनतेचे जितके आभार मानू तेवढे थोडेच अशा शब्दांत रविशेठ पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आघाडीचे उमेदवार धैर्यशील पाटील यांचा 30 हजारांहून अधिक मतांनी पराभव करीत रविशेठ पाटील यांनी पेण मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ फुलविले. रविशेठ पाटील यांच्या विजयानंतर पेण, सुधागड, रोहा मतदारसंघात सर्वत्र युतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. पालीत देखील रविशेठ पाटील यांचे जंगी स्वागत व मिरवणूक काढण्यात आली. पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. मतदारसंघातील जनतेला भेडसावणारे मूलभूत प्रश्न व समस्या सोडवून विकासाला प्राधान्य देणार असल्याचे आ. पाटील म्हणाले. राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून जनतेला अपेक्षित व अभिप्रेत असलेला विकास घडवून आणणार, मतदारसंघाचा कायापालट करणार असल्याचे आ. पाटील म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेणमध्ये प्रचारासाठी सभा घेतली. याचा प्रचंड फायदा झाला. केवळ पेण मतदारसंघात नव्हे, तर सबंध जिल्ह्यात महायुतीची वातावरणनिर्मिती झाली. कार्यकर्त्यांत प्रचंड जोश व उत्साह संचारला. युतीच्या उमेदवारांसाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगत रविशेठ पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. जिल्ह्यात पाच जागांवर महायुतीने घवघवीत यश संपादन केले. शेतकरी कामगार पक्षाच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचे काम महायुतीने केले. शेकापच्या बालेकिल्ल्यात 30 हजारांच्या फरकाने पराभव होणे ही त्यांची मोठी हार आहे. जनता आघाडीला कंटाळली आहे. हे या निवडणुकीने दाखवून दिले. पेण मतदारसंघासह जिल्ह्यातील बेरोजगारी संपविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. याबरोबरच खारजमिनीचा प्रश्न, पाणी, रस्ते, व विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे रविशेठ पाटील म्हणाले.  एकेकाळी रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जात असे, आजघडीला अतिवृष्टी, परतीचा पाऊस, खारबंदिस्तीची समस्या आदी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतजमिनी नापीक होत चालल्या आहेत. शेतकरी देशोधडीला लागत आहेत. आजमितीस सर्वत्र भातपीक  उद्ध्वस्त झाले असून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणार असल्याचे आ. पाटील म्हणाले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply