शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन
उरण : प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकनेते दि. बा. पाटील यांचे विशेष फलक लावूया, असे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक म्हणाले. ते उरण तालुक्यातील जासई येथे हुतात्म्यांच्या अभिवादनावेळी बोलत होते.
महात्मा फुले सामाजिक प्रबोधन व परिवर्तन प्रतिष्ठान जासईच्या वतीने 1984मधील गौरवशाली व शौर्यशाली शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांचा 41वा स्मृतीदिन गुरुवारी (दि.16) हुतात्मा मैदान जासई येथे आयोजित करण्यात आला होता. सरकार आणि सिडकोविरोधात उरणमध्ये शेतकरी आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनातील पाच शेतकरी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जासई येथील हुतात्मा स्मारकात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. स्मारकाच्या प्रांगणातील हुतात्म्यांना तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील व दि. बा. पाटील यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. तर दरवर्षीप्रमाणे हुतात्मा दिनानिमित्त चिर्ले येथे नामदेव शंकर घरत, तर धुतूम येथे रघुनाथ अर्जुन ठाकूर यांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पनवेलच्या महात्मा ज्योतिबा फुले आर्टस, सायन्स आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली.
या वेळी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, दि. बा. पाटील हे केवळ प्रकल्पग्रस्तांचे नव्हे तर देशाचे नेते होते. कष्टकरी वर्गाच्या हितासाठी लढण्याचा त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करून पक्षीय मतभेद असतांनाही सर्वांना एकत्र करून लढे दिले. समाजाची जात पात न मानता सेवा केली पाहिजे. तर फेब्रुवारी महिन्यात नवी मुंबईतील शेतकर्यांच्या व प्रश्नांवर मुख्यमंत्र्या सोबत बैठक घेतली जाईल. त्याचप्रमाणे एप्रिलमध्ये नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव लागणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तर नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची जानेवारी 2025 पर्यंतची घरे कायम करा अशी भूमिका या वेळी त्यांनी मांडली. नवी मुंबई विमानतळावर ‘दिबां’चे विशेष फलक लावण्याची इच्छाही राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केली.
या वेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी यांनीही आपले विचार मांडले. त्यांनी भूमिपुत्रांचे प्रश्न वेळीच सुटणे गरजेचे असल्याचे मत मांडले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, कामगार नेते महेंद्र घरत, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार बाळाराम पाटील, मनोहर भोईर, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, कामगार नेते जितेंद्र घरत, सुरेश पाटील, भूषण पाटील, पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर चौरुशीला घरत, दि.बा.पाटील यांचे सुपूत्र अतुल पाटील, अभय पाटील, भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, चंद्रकांत घरत, दिनेश पाटील, जे.डी.तांडेल, विनोद म्हात्रे, माजी नगरसेवक हरेश केणी, विकास घरत, तेजस कांडपीळे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, भावना घाणेकर, शिवसेनेचे रामदास शेवाळे आदी उपस्थित होते. या वेळी केंद्रीय नागरी विमान उड्डाणमंत्री मुरलीधर मोहळ यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला.