Breaking News

म्युकरमायकोसिसचे उपचार मोफत होणार

आ. मंदा म्हात्रेंच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद

नवी मुंबई : प्रतिनिधी

कोरोना आजारातून निर्माण होणार्‍या म्युकरमायकोसिस आजाराचे उपचार मोफत व्हावे तसेच नवी मुंबईतील खासगी हॉस्पिटलमध्येही सामान्य नागरिकांना या आजाराचे उपचार मोफत करण्याचे आदेश देण्याबाबत बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. आयुक्तांनीही सकारात्मक प्रतिसाद देत महापालिकेमार्फत मोफत उपचार करण्याचे तसेच नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल व वाशी येथील हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटल येथे म्युकरमायकोसिस या आजारावर मोफत उपचार करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

आमदार निधीतून उपलब्ध करण्यात येणार्‍या ऑक्सिजन प्लांट लवकरात लवकर उभारणे, नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागात उद्यान अधिकारी नसल्याने कनिष्ठ अधिकार्‍यांवर कामाचा ताण पडतो, याकरिता उद्यान अधिकार्‍यांची नियुक्ती करणे; नवी मुंबईतील महावितरण वीज कर्मचारी, शिक्षणासाठी बाहेरगावी जाणार्‍या विद्यार्थी, बँकिंग कर्मचारी यांनाही लसीकरण मोहिमेत समावेश करण्यात येणे, नवी मुंबईतील सर्व पत्रकारांनाही अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून लसीकरण व्यवस्था देण्यात यावी; वाशी सेक्टर-17 येथील नाल्यावर झाकण टाकून तेथे सुशोभीकरण करणे, करावे गाव मधील अनेक नागरिकांना देण्यात आलेले वाढीव मालमत्ता कर कमी करण्यात ययावी; एपीएमसी मार्केटमध्ये स्वच्छता गृहे बांधण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्यात यावी; हॉस्पिटल मधून निघणार्‍या कचर्‍याची योग्य रीतीने विल्हेवाट लावणे; एपीएमसी मार्केटमध्ये स्वच्छता करणे, अशा अनेक विषयांवर या वेळी चर्चा करण्यात आली. 

म्युकरमायकोसिस या आजारावरील उपचाराकरिता लागणारी औषधे महागडी असल्याने गरीब व सामान्य रुग्णांना परवडणारी नाहीत. या आजारावरील औषधे व उपचार मोफत केल्यास रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल, तसेच म्युकरमायकोसिस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. याकरिता नवी मुंबईतील खाजगी हॉस्पिटलमध्येही या आजाराचे उपचार मोफत करण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली.

या वेळी इतरही काही मागण्या केल्या यावर आयुक्तांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सर्व मागण्या पूर्ण करण्याचे  आश्वासन दिल्याने आमदार मंदा म्हात्रे यांनी त्यांचे आभार मानले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply