नेरळ विकास प्राधिकरणकडून 86 लाखांचा निधी
कर्जत : बातमीदार
नेरळ एसटी स्टँडकडे जाणारा रस्ता गेली दहा वर्षे खड्ड्यात हरवला होता. रायगड जिल्हा परिषदेच्या मालकीच्या या रस्त्याचे नूतनीकरण करण्यासाठी निधीदेखील उपलब्ध नव्हता. मात्र नेरळ विकास प्राधिकरणाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर आता नेरळ एसटी स्टँड रस्त्याचे काँक्रीटकरण केले जात असून पुढील दहा वर्षे हा रस्ता खराब होणार नाही, असा दावा केला जात आहे.
नेरळ रेल्वे स्टेशन आणि प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी एसटी स्टँड रस्त्याने जावे लागते. माथेरान-नेरळ-कळंब रस्त्याने गणेश स्वीट येथून 400 मीटर अंतरावर नेरळ एसटी स्टँड आहे. हा रस्ता रायगड जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे. मात्र या रस्त्यासाठी जिल्हा परिषदेकडून कधीही मोठा निधी मिळाला नाही.त्यामुळे येथील जय मल्हार रिक्षा वाहतूक संघटना दरवर्षी स्वतः पैसे काढून खड्डे भरत आली आहे.
नेरळ विकास प्राधिकरणाने जानेवारी 2021 मध्ये या रस्त्याचे काँक्रीटकरण करण्यासाठी तब्बल 86 लाखाचा निधी मंजूर केला. या निधीमधून रस्त्याचे काँक्रीटकरण सुरू असून त्यासाठी एसटी स्टँड रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. रस्त्यावर खडीकरण करून नंतर रोलिंग आणि आता काँक्रीटकरण सुरू आहे.त्यात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असल्याने सिमेंट काँक्रीटचे काम आणखी मजबूत आणि दर्जेदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रस्त्याचे काम व्हावे यासाठी दोनवेळा केलेल्या उपोषणाचा फायदा झाला. प्राधिकरणाने 86 लाख निधी दिल्याने या रस्त्याचे काम दर्जेदार होत आहे. या रस्त्याच्या संरक्षण भिंतीसाठी आता जिल्हा परिषदेने निधी द्यावा.
-विजय हजारे, सामाजिक कार्यकर्ते, नेरळ