पोलादपूर ़़: प्रतिनिधी
तालुक्यात गेल्या दोन तीन दिवस अवकाळी पावसाने सातत्य ठेवले असून, त्यामुळे भोराव ते हावरे या सप्तक्रोशीतील रस्त्यांवरील खड्डयांमध्ये पाणी साचले आहे. महावितरणने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीविनाच भूमी अंतर्गत वीजवाहिन्या टाकण्याचे काम केल्यामुळे सप्तक्रोशी भागातील रस्त्यांवर पाण्याच्या डबक्यांबरोबरच चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.पोलादपूर तालुक्यातील भोराव ते हावरे या रस्त्याच्या कामाचे भुमिपूजन होऊन काम सुरू झाले. तथापि, कामाचा दर्जा निकृष्ट राहिल्याने गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यात पाण्याखाली राहून या रस्त्याचे नुकसान होत आहे. गेल्या दोन – चार दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने भोराव ते हावरे या रस्त्याची अवस्था फारच बिकट झाली आहे. अवकाळी पावसामुळे रस्त्याचे रूपांतर अनेक खाचखळग्यांच्या डबक्यांमध्ये झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच महावितरणकडून या रस्त्यालगत अंडरग्राऊंड केबल टाकण्याचे काम करण्यात आले आहे. त्याबाबत बांधकाम विभागाने महावितरणला नोटीसही बजावली आहे.