9 मे 1981 रोजी माझी संस्थेच्या सचिवपदी निवड झाली. आतापर्यंत सचिव म्हणून काम केलेल्या व्यक्तींमध्ये मी सर्वांत तरुण होतो. पहिले इस्माईलसाहेब मुल्ला, मुल्लासाहेब सलग 30 वर्षे संस्थेचे सचिव होते. संस्थेचा एक पैसाही ते घेत नसत. कोर्टाचे काम संपल्यानंतर सायंकाळी 6 वाजेनंतर संस्थेच्या ऑफिसमध्ये येत व संस्थेचे काम पाहत. अतिशय साधा व सरळ माणूस, इस्त्री न केलेले कपडे, काळा कोट, डोक्यावर काळी टोपी. दुसरे सचिव बॅरि. पी. जी. पाटील एक वक्ता म्हणून ख्यातकीर्द होते. तिसरे प्रिं. ए. डी. साळुखे अनेक वर्षे ऑडिटर नंतर सहसचिव म्हणून त्यांची कारकीर्द अतिशय गाजली. सचिव म्हणूनही त्यांनी काम केले. माझ्याबरोबर रायगडला जाण्यासाठी प्रिं. ए. डी. साळुखे आले होते. 10 मे 1981 रोजी माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या मुलीचे पनवेल येथे लग्न होते. दि. बा. बोले व पनवेल हाले अशीच त्यांची ख्याती होती. या लग्नामध्ये गेल्यानंतर एक तरुण मला पाहिल्यानंतर पळत माझ्याकडे आला व माझ्या पाया पडला. मी तुमचा विद्यार्थी, माझे नाव राम ठाकूर, शिवाजी कॉलेजमध्ये कमवा व शिकामध्ये शिकलो आहे. तुम्ही आम्हाला इतिहास विषय शिकवत असत. तुमची शिकवण्याची पद्धत अतिशय छान होती. बिस्मार्क, प्रिं. टोफॉन बिस्मार्कबद्दल He was Jugglar playing with five balls out of five three were always in the air. (इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रोलिया, रशिया इ.). युरोपीय राजकारणातील रशियाचा इतका चांगला उल्लेख बिस्मार्कचा केलेला असायचा. हिटलर शिकवताना दुसर्या महायुद्धासाठी नाझी सैनिक युद्धावर जात असताना या सैनिकांना तो सॅल्यूट देत होता. हवेमध्ये सलग सात तास त्याचे हात स्थिर होते. कसलीही हालचाल नाही. त्याचे सैनिक सॅल्यूट स्वीकारत पुढून जात असत. इटलीच्या मुसोलिनीबद्दल What war is to man maternity is to woman. मुसोलिनीचे एवढे योग्य वर्णन कोणीही केलेले नसेल. इतिहासाचा तुमचा तास मी कधीही चुकवत नसत. युरोपचे सर्व राजकारण तुम्हीच योग्यरीत्या सांगत होता. एका विद्यार्थी मित्राने इतरांसमक्ष मला हे सांगितले. लग्नाच्या दुसर्या दिवशी मी कॉलेजची आर्थिक माहिती परदेशी नावाच्या सुपरिटेडेंटकडून घेतली. त्याने सांगितले की, यूजीसीकडून आलेल्या रकमेचा वापर माझ्या आधीच्या प्राचार्य शेख सरांनी इतर बाबींवर खर्च केला आहे. त्यांच्या कारकिर्दीत दृष्ट लागण्यासारखी कॉलेजची इमारत उभी केली होती. यूजीसीकडून मात्र युटिलायझेशन सर्टिफिकेट पाठवा असा तगादा लावला होता. 10-12 लाखांची रक्कम व त्यावर होणारा दंड लवकर भरा, अशा नोटिसा दिल्लीवरून आल्या होत्या. कॉलेजची आर्थिक परिस्थिती ही भयावह होती. आपण यातून कसे बाहेर पडावे म्हणून मला काळजी वाटत होती. पनवेल कॉलेजपासून दोन-तीन किमी अंतरावर संस्थेची एक शाखा होती. तेथील विद्यालयाचे हेडमास्तर श्रीयुत आडमुठे यांची मी भेट घेतली. ते म्हणाले, सर, घाबरण्याचे कारण नाही. पनवेलमधील अनंता शेठ यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी मला नेले. अनंता शेठ यांना हे सांगितल्यानंतर उद्या मी तुमचा विद्यार्थी रामशेठ ठाकूर यांना कॉलेजवर घेऊन येतो. त्यांना तुमची अडचण सांगा. तुमच्याबद्दल ते एवढे बोलतात त्यामुळे तुमची अडचण चुटकीसरशी दूर होईल. आणि खरंच रामशेठ ठाकूरला घेऊन अनंता शेठ कॉलेजवर आले. मी त्यांना माझी अडचण सांगितली. बाकी काहीही न बोलता उद्यापासून कामाला सुरुवात करा. 5-10 हजार पाहिजे असेल तर माझ्याकडून घेऊन जा. जर एक-दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम पाहिजे असल्यास मला आदल्या दिवशी सांगत जा आणि घडलेही तसेच. सुमारे 15 लाख रुपये खर्च झाला. हॉल तयार झाला. मला झालेला आनंद अवर्णनीय होता. हॉलचे फर्निचर, रंग, लाइटकामही त्यांनी केले. त्या हॉलला कोणाचे नाव द्यावे असे मी त्याला विचारले. नाव देण्याची जरूरी नाही, असे म्हणून ते निघून गेले. नंतर मी रामशेठ ठाकूर यांच्या घराची थोडी माहिती घेतली. रामशेठ ठाकूर यांचे सासरे जनार्दनशेठ भगत आहेत असे समजले आणि मी त्या हॉलला जनार्दन भगत यांचे नाव दिले. दरम्यान, कोल्हापूर शहरात शेकापचे वार्षिक अधिवेशन झाले होते. जनार्दनशेठ भगत यांच्याशीदेखील माझी ओळख होती. जनार्दनशेठ यांचे नाव दिल्याचे कळाल्यानंतर रामशेठ ठाकूरांना आनंद झाला. याच वर्षी होणार्या कॉलेजच्या बक्षीस समारंभ कार्यक्रमात मा. शरद पवार यांना बोलाविले होते. कार्यक्रमात प्रास्ताविक करताना मी या गोष्टीचा सविस्तर उल्लेख केला. या गोष्टीचा धागा पकडून अहो, रायगडमध्ये जावई चांगले मिळतात हे मला माहीत नव्हते, त्या वेळी प्रचंड हशा झाला. रामशेठ ठाकूर यांचे मला प्रचंड सहाय्य होते. इतरही आपापल्या परीने अनेक प्रकारे मदत करीत असत. रामशेठ ठाकूरांच्या दिलदारपणाबद्दल किती सांगावे हे मलाही कळत नाही. आता पनवेल कॉलेजबद्दल मला कसलीही काळजी नव्हती. रामशेठ ठाकूर जेव्हा भेटत आणखी काही पाहिजे का, असे विचारत. संस्थेचे काम पाहत. त्यांनी किती कोटी रुपये देणगी स्वरूपात दिले हे सांगितले तर तुमचे डोळे विस्फ़रतील. गव्हाणच्या शाखेला 1.5 कोटींची इमारत, रिटघर शाखेला 1.5 कोटींची इमारत, पनवेलमधील कामोठे येथील इंग्लिश व मराठी स्कूल त्यांनी उभे केले. किती देणगी दिली हे ते सांगत नाहीत. त्यांचा विरोध असतानाही त्यांच्या पत्नीचे शकुंतलाताईंचे नाव संस्थेने दिले. या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत सुमारे 30 कोटींपेक्षा जास्त रुपये दिलेत. रायगड विभागात एकूण 30 शाखा आहेत. या शाखांमध्ये देणगीदारांच्या यादीत रामशेठ ठाकूर यांचे नाव अग्रस्थानी आहे. या शाखांना 50 हजारांपेक्षा जास्तच देणगी दिली आहे. आज खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब हे संस्थेचे अध्यक्ष म्हणून व रामशेठ ठाकूर मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य म्हणून आहेत. आजही पवारसाहेब सांगतील तो आकडा ते हसत हसत मान्य करतात. रायगडच्या सल्लागार मंडळाचे चेअरमन मा. आमदार बाळाराम पाटील हे नुकतेच शिक्षक आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्याबद्दलही थोडे लिहावे लागेल. मा. आमदार बाळाराम पाटील पनवेल कॉलेजमध्ये शिकत असताना जिमखाना निवडणुका लागल्या. ते स्वत: जनरल सेक्रेटरी पदासाठी उभे होते. त्यांनी स्वत:चे पॅनेल टाकले होते. याच वेळी आणखी एक पॅनेल पुढे आले. बाळाराम पाटलांच्या विरोधी जनरल सेक्रेटरीपदासाठी एक विद्यार्थी उभा होता. प्रा. अरविंद मोरेंचा हिंदीचा तास चालू होता. बाळारामने कोणाही शिक्षकांना न विचारता कसलीही परवानगी न घेता त्यांच्या वर्गात प्रवेश केला. विरोधात उभ्या असलेल्या विद्यार्थ्याला वर्गातून बाहेर काढून रक्तबंबाळ होईपर्यंत मारले. सर्व शिक्षक माझ्याकडे येऊन संरक्षण द्या आम्हाला, असे म्हणाले. मी प्रथम मजल्यावर त्यांच्यासह गेलो. मारहाण चालूच होती. मी बाळारामला समज दिली. कॉलेज संपल्यावर काही प्राध्यापक आले. तुम्ही काही योग्य केले नाही. त्यांच्या मते बाळाराम पाटील हा आमदार दत्तूशेठ पाटील-नावडेकर यांचा मुलगा आहे. मी रामशेठ ठाकूर यांना फोन केला व सर्व कथा सांगितली. ते म्हणाले, दत्तूशेठ हा अतिशय चांगला माणूस आहे. काहीही घडणार नाही. त्या रात्री माझ्या क्वार्टरवर झोपण्यासाठी प्रा. बी. एल. पाटील आले होते. रात्री 11च्या पुढे मा. दत्तूशेठ यांचा फ़ोन आला. त्यांच्या कोकणी टोनमध्ये माझ्या मुलाला शिक्षा केली ते योग्यच केले. हेच बाळाराम पुढे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून नावारूपास आले. रामशेठ ठाकूर यांना माणसेही ओळखण्याची कला होती. एकदा मी पनवेलमध्ये माझ्या मुलीकडे असताना शेठचा फोन आला. त्यांनी मला रात्री आठला जेवायला बोलाविले. रात्री 9 वाजेपर्यंत मी ऑफिसमध्ये फोनची वाट पाहत बसलो होतो. पत्नीने सांगितले की, रामशेठ ठाकूर यांचा मुलगा प्रशांत ठाकूर यांचा सारखा फोन येतोय. तुम्ही त्यांना फोन करा. रामशेठ ठाकूर काही कामासाठी बाहेरगावी गेले होते. त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही जबाबदारी प्रशांतवर टाकली होती. घरातील सर्वांची त्यांनी ओळख करून दिली. ते म्हणाले, आमचे आजचे जेवण खास आहे. समुद्रात सापडणार्या मोठ्या माशाच्या मेंदूचे कालवण केले आहे. तुमच्यासाठी हा मुद्दाम बेत केला आहे. येथील कोकणी माणसे अत्यंत प्रेमळ की इतके प्रेम करू नये असे अनेकदा मला वाटे. माझे पनवेलचे काम अनेक पनवेलकरांना व नागरिकांना पसंत पडले होते. एके दिवशी श्री. पाटील नावाचा सेक्रेटरी माझ्या ऑफिसमध्ये आला व मला म्हणाला, सर, आम्ही सर्व विद्यार्थी या प्रांगणात शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा फ़क्त मुलांमुलींनी दिलेल्या देणगीतून बसवणार आहोत. इतर कोणाकडून एक पैसाही घेतला जाणार नाही. पैसे फ़क्त विद्यार्थीवर्गाकडून गोळा केले जातील. दि. बा. पाटील मला म्हणाले, तुमची बदली पनवेलला शिक्षा करावयाची म्हणून पूर्वीच्या चेअरमननी केली आहे. आम्हाला मात्र तुमची बदली वरदान ठरली आहे. रामशेठ ठाकूर म्हणाले, वार्षिक मनोरंजनाचा कार्यक्रम कसा पार पडेल हा आमच्यापुढे प्रश्न असायचा. आपण आल्यावर येथील कॉलेजचे वातावरण पूर्ण बदलले आहे. माझ्या कारभाराची दोघांनीही तोंडभरून स्तुती केली. कॉलेजच्या लोकल मॅनेजिंगची कमिटी लागल्यानंतर दिबांच्या उपस्थितीमुळे प्राचार्यांना घाम ़फुटत असे. कोणत्या वेळी ते काय बोलतील ते कळत नसे. मी मात्र सविस्तर प्रास्ताविक करून कुठलाही विषय चर्चेस शिल्लक ठेवत नसे. मुले वर्गात शांतपणे बसत असत. आवारात कोणीही दिसत नसे. प्राध्यापक वर्गामध्ये शिकवण्यात दंग असत. अलीकडे रामशेठ ठाकूर मीटिंगच्या निमित्ताने सातार्यात आल्यावर मला या कॉलेजसाठी काहीतरी करावयाचे आहे, असे संस्था चेअरमनना बोलले. मी हे ऐकले व म्हणालो, रामशेठ ठाकूर, इमारत अशी झाली पाहिजे की पुढील 25-30 वर्षे कोणाही एका माजी विद्यार्थ्याला तुझ्या देणगीला ओव्हरटेक करता येऊ नये. यानंतर ते म्हणाले, तीन कोटी मी देण्याचे ठरविले आहे. आणखी किती वाढवू. ठीक आहे, मी पाच कोटी देतो. असे हे दानशूर माजी खासदार रामशेठ ठाकूर.
-प्रिं. आर. डी. गायकवाड, सातारा