शरदचंद्र गोविंदराव पवार! पु. ल. देशपांडे यांच्या नंतरचं एक लाडकं (राजकीय) व्यक्तीमत्व!! थांबा, पटकन सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करू नका. मी काही महाराष्ट्राचे थोर साहित्यिक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ऊर्फ पु. ल. उर्फ भाई यांची आणि शरद पवार यांची बरोबरी करीत नाही. भाई पु. लं.चे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष आहे. तसे ते ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके आणि स्नेहल भाटकर यांचेही जन्मशताब्दी वर्ष आहे. पण पु. लं. ना आपण महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व म्हणतो तद्वतच शरद पवार हे सुद्धा राजकीय क्षेत्रातील लाडके व्यक्तीमत्व म्हणावे लागेल. लागेल म्हणजे काय आहेतच ते. कारण राजकारण्यांना शरद पवार यांचं नांव घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाही इतके ते लाडके आहेत.
मागच्या एका लेखात मी म्हटलं होतं की, भगवान श्रीकृष्ण हे आद्य राजकारणी. श्रीकृष्णानंतर थेट शरद पवार. वास्तविक आता शरदरावांनी मार्गदर्शक या भूमिकेत असायला हवं होतं. पण ते त्यांना जमत नाही असं दिसतंय. राजकारण आणि शरद पवार या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटायला लागल्या आहेत. राम गणेश गडकरी यांच्या एकच प्याला नाटकात तीन टप्पे दाखवले आहेत. पहिल्या टप्प्यात दारु त्याला सोडत नाही, दुसर्या टप्प्यात तो दारुला सोडत नाही आणि तिसर्या टप्प्यात दोघेही एकमेकांना सोडत नाहीत. तसा हा शरद पवार यांच्या बाबतीत तिसरा टप्पा दिसतोय.
शरद पवार आणि राजकारण हे दोघेही एकमेकांना सोडण्याच्या परिस्थितीत दिसत नाहीत. वयाच्या अवघ्या सदतीसाव्या वर्षी वसंतदादा पाटील यांच्या (पाठीत खंजीर खुपसून असं त्यावेळी म्हटलं जात होते) मंत्रिमंडळातून राज्यमंत्री असलेल्या शरद पवार यांनी जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांना एकत्र करून पुरोगामी लोकशाही दल स्थापन केला आणि सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणून विक्रम प्रस्थापित केला. देवेंद्र फडणवीस हे वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी मुख्यमंत्री झाले. पण सर्वात कमी वयाच्या मुख्यमंत्री पदाचा विक्रम शरदरावांच्या नांवावर अद्यापही कायम आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवले तर आदित्य उद्धव ठाकरे कदाचित शरदरावांचा हा विक्रम मोडू शकतील. अर्थात दूर दूरवर ही शक्यता दिसत नाही. तर मी म्हणत होतो की शरदरावांना जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांंचं 1978 सालापासूनच वावडं नाहीये. कारण 1978 साली पुलोद मंत्रिमंडळात जनता पार्टीचे हशू अडवाणी, उत्तमराव पाटील, डॉ. प्रमिलाताई टोपले हे नेते होते जे जनसंघाचे होते आणि भारतीय जनसंघ हा 1977 साली जनता पार्टीत विलीन करण्यात आला होता.
शरदरावांनी भले शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला जातीयवादी म्हणून हिणवले असेल पण संघ आणि भाजप यांचे त्यांना वावडे मुळीच नाही. हे सगळं पुन्हा पुन्हा सांगायचं यासाठी की लोकसभा निवडणूक-2019 च्या संपूर्ण प्रचार रणधुमाळीत शरद पवार यांची भूमिका ही उलटसुलटपणे मांडली जात होती. आधी माढा मतदारसंघात उमेदवारी मग माघार, आधी अजितदादा पवार यांचे सुपुत्र पार्थ यांच्या उमेदवारीला विरोध मग त्याला निवडून आणण्यासाठी आटापिटा (?), सुकन्या सुप्रिया सुळे यांच्या
बारामतीमध्ये जर अनपेक्षित निकाल लागला तर ल़ोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल, असं वक्तव्य करणे, सात टप्प्यातल्या निवडणुकीचे चार टप्पे संपताच चंद्राबाबू नायडू यांच्या मागे फरफटत जात मतदान यंत्रांच्या(इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) संदर्भात आक्षेप घेणे, निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची धूळधाण उडाली. चंद्राबाबू नायडू यांची तर अशी परिस्थिती झाली की ते अजूनही त्या जबरदस्त धक्क्यातून सावरलेले दिसत नाहीत. शरद पवार यांचा ईव्हीएमबद्दलचा आक्षेप अजूनही कायम दिसतोय, फरक केवळ त्याच्या शब्दांचा आहे. एका बाजूला शरद पवार हे आपली सुकन्या सुप्रिया सुळे या बारामतीत निवडून येऊनही ईव्हीएमवर शंका घेताहेत तर दुसरीकडे शरद पवार यांचे पुतणे अजितदादा पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ येथे पराभूत होऊनही ईव्हीएमवर शंका घेत नाहीत. उलट ईव्हीएमचा घोटाळा असता तर पाच राज्यांत भारतीय जनता पक्ष हरला नसता, अशा शब्दांत घरचा अहेरच जणू काकाश्रींना अजितदादांनी दिला असं म्हणावं लागेल. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लागलीच शरदराव दुष्काळी परिस्थिती पाहण्यासाठी रवाना झाले. केंद्रात दहा वर्षे आणि राज्यात पंधरा वर्षे सत्तेवर असतांना शेतकर्यांना दिलासा देऊ न शकलेले तत्कालीन सत्ताधारी जेव्हा मोदी आणि फडणवीस सरकारच्या नावाने बोटे मोडतांना लोकं पहात होती तेव्हा त्यांना नक्राश्रू दिसत होते. हिंदुस्थानच्या पंतप्रधानपदासाठी ज्यांच्या नांवाची उठसूठ चर्चा होते त्या नेत्यांच्या वागण्या बोलण्यात पराकोटीची विसंगती जेव्हा दिसते, तेव्हा हेच का आपले नेते? असा प्रश्न पडावा. चार वेळा मुख्यमंत्री पद भूषविलेले, हिंदुस्थानचे संरक्षण मंत्री पद, कृषिमंत्रीपद भूषविलेले नेते जेव्हा तमाम 130 कोटी जनतेच्या ह्रदय सिंहासनावर आरुढ व्हायला हवे होते त्या नेत्यांबद्दल नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या आणि केंद्रीय मंत्रिमंडळ शपथविधी समारंभात पहिली की पाचवी रांग यावरुन गोंधळ निर्माण व्हावा, राष्ट्रपती भवनातून स्पष्टीकरण करण्यात यावे की ती ही रांग पाचवी नसून अति महत्वाच्या व्यक्तींची पहिली रांग आहे. ज्या रांगेत सुषमा स्वराज, योगी आदित्यनाथ, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांची रांग पहिलीच होती आणि शरदरावांचीसुद्धा रांग पहिलीच होती. मग या मुद्यावर एवढा गहजब का बरे झाला? राजशिष्टाचार (प्रोटोकॉल)ची माहिती ज्यांनी वर्षानुवर्षे सत्ता भोगली, उपभोगली त्यांना नसावी? की भाषेची समस्या अजूनही भेडसावतेय? एक किस्सा मधूनमधून ऐकायला मिळतो, खरंखोटं शरदरावच जाणोत. जेव्हा शरदराव पहिल्यांदा लोकसभेत गेले तेव्हा त्यांनी माननीय अध्यक्ष महाराज असे म्हणताच एकदम हंशा पिकला. कारण उत्तरेकडे स्वयंपाक्याला, आचार्याला ’महाराज’ संबोधतात. त्यानंतर शरदरावांनी शिकवणी लावल्याची चर्चा होती, असं म्हणतात. खरंखोटं शरदरावच सांगू शकतील. परवा तर शरदरावांनी एकदम षटकारच ठोकला. पिंपरी येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शरदरावांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ज्या चिकाटीने कार्य करीत असतात तशीच चिकाटी अंगी बाणवा, स्वयंसेवकांकडून चिकाटी शिका, असा सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना दिला आणि आता विधानसभा निवडणूक केवळ 98 दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यादृष्टीने कामाला लागा, असा जणू आदेशच शरदरावांनी कार्यकर्त्यांना दिला. एका वेळी ईव्हीएमवर शंका घेऊन भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व यशाला आक्षेप घेणारे शरद पवार हे पिंपरी येथील कार्यकर्त्यांच्या समोर बोलताना सांगतात की, पाकिस्तानवर हल्ला करून या दहशतवादाला खतपाणी घालणार्या शेजारी राष्ट्राला आपणच धडा शिकवू शकतो, हे भारतीय जनता पक्षाने हिंदुस्थानच्या जनतेला पटवून देण्यात यश मिळविले आणि संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाने हा विश्वास संपादन केला. त्यामुळेच जनतेने भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात भरभरुन मतदान टाकले. म्हणजेच दहशतवाद, कश्मीर याबाबतीत काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए)ची भूमिका जनतेने धुडकावून लावली आणि भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या 543 पैकी तब्बल 303 आणि भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 353चे मजबूत दान दिले असल्याची कबुलीच एका अर्थाने शरदरावांनी दिली. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी दबक्या आवाजात, नाही तरी आम्ही निवडणुकीनंतर मोदींनाच पाठिंबा देणार आहोत, असं सांगितल्याचे चर्चिले जात होते, यावर एकप्रकारे शरदरावांनी शिक्कामोर्तबच जणू केलंय, असे म्हणण्यास वाव आहे. शरदरावांचं हे वागणेसुद्धा काय सांगून जातंय ते राजकीय निरीक्षकांना बुचकळ्यात टाकणारेच म्हणावे लागेल. शरद पवार हे कुणालाही कळलेलेच नाहीत, हे मात्र खरे आहे. वंचित बहुजन आघाडी स्थापन करणारे प्रकाश आंबेडकर हे तर शरद पवार यांच्यावर एवढी टीका करतात की जणू शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर हे दोघेही साताजन्माचे वैरी आहेत की काय? असा प्रश्न पडावा. शरदरावांनी आता तरी आपला आब राखावा आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात आलेल्या नवीन सरकारला समर्थन द्यावे. ’सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या नवीन घोषणेप्रमाणे वाटचाल करावी आणि देशवासियांना’अच्छे दिन’ दाखविण्यसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी.
शरद पवार यांना राजकारणात कुणीही ’अस्पृश्य’ नाही त्यामुळे ज्याअर्थी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची वाखाणणी करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संघ स्वयंसेवकांकडून चिकाटीने काम कसे करावे, हे शिकावे असा सल्ला दिला त्याअर्थी त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि पर्यायाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी जुळवून घ्यावे. कारण नाही तरी काँग्रेस पक्षाचे काही खरे नाही. हां! काँग्रेस पक्षाला संजीवनी द्यावी, असे जर शरदरावांना वाटत असेल तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करावा. कारण काँग्रेस पक्ष ज्या कारणासाठी सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, ते कारणच आज शिल्लक राहिलेले नाही. मग दोन काँग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याची गरज काय? नाही तरी 1999 साली काँग्रेस पक्षाबरोबर फारकत घेऊनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालीच आघाडीत रहात असतील तर मग स्वाभिमानाच्या गप्पा मारण्यात अर्थ तो काय राहिला?, असा सवाल जर कुणी उपस्थित केला तर तो त्याचा सवाल चुकीचा निश्चितच नसेल. ही एकूणच राजकीय परिस्थिती पाहता ’शरदरावांचं नक्की काय चाललंय? हाच प्रश्न पडतो. खरे नां?
-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर