Breaking News

घरफोडी, वाहनचोरीचे प्रकार वाढले

पनवेल परिसरातील भितीयुक्त वातावरण

पनवेल : वार्ताहर

पनवेल परिसरात दिवसेंदिवस वाहनांच्या चोरी आणि घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारांमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

नुकतेच कामोठे वसाहतीमध्ये राहत्या घरातील बेडवर ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. कामोठे वसाहतीमध्ये राहणार्‍या भाविका चित्रोडा यांनी त्यांना मुळगावी जायचे असल्याने काही कपड्यांसह सोन्याचे दागिने ज्याची किंमत जवळपास 45 हजार रुपये इतकी आहे. हे घरातील बेडवर बॅगेत भरण्यासाठी ठेवले असता दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, तर दुसर्‍या घटनेत खारघरमध्ये दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रकमेची चोरी केली आहे. खारघर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीआयएसएफ येथे निरीक्षक पदावर काम करणारे अविनाश अमर हे खारघर सेक्टर 35 डी येथे राहतात. ते मुंबई येथे कामासाठी गेले होते. कामावरून परत आल्यानंतर त्यांना त्यांच्या दरवाज्याचा लॉक तूटलेला दिसला. या वेळी चोरट्यांनी 35 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, मोबाइल आणि पाच हजार रुपये चोरून नेले. 

पनवेल शहरातील बिल्डिंगच्या पार्किंगमधून 90 हजार रुपयांच्या दुचाकीची चोरट्यांनी चोरी केली आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाईन आळी येथे राहणारे अनिल दगडू भालेराव यांच्या मुलाने श्रेया वल्लभ बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये दुचाकी एमएच 46 बीटी 7548 पार्क केली होती. चोरट्याने या गाडीची चोरी केली आहे. तर दुसर्‍या घटनेत तक्का येथे स्वतःच्या ताब्यात असलेली मूळ मालकाची मारूती सुझुकी वॅगेनार गाडी घेऊन चालक पसार झाला आहे. हनिफ चौधरी यांची तीन लाखांची मारूती सुझुकी वॅगेनार गाडी ही चालक सत्यम वाघमारे यांच्या ताब्यात देण्यात आली होती. ही गाडी नेऊन ती परत न करता परस्पर स्वतःच्या फायद्यासाठी अन्यायाने विश्वासघात करून अपहार करून तिची विक्री केली. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply