Monday , January 30 2023
Breaking News

दि. बा. पाटील यांच्या जीवाशी खेळण्याचा पोलिसांचा डाव फसला

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…
शेवे गावात पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबाराची व शेतकर्‍यांच्या बायकामुलांसह त्यांना केलेल्या अमानुष मारहाणीची चौकशी करण्यासाठी गेलेल्या दि. बा. पाटील यांना पोलिसांनी त्वरित अटक केली. पोलीस त्यांच्याशी अतिशय निर्दयीपणाने वागले. असभ्यरीत्या वर्तन केले. त्यांना मानहानीकारक वागणूक दिली. त्यामुळे त्यांची शुद्ध हरपली. पोलिसांनी हे सारं जाणीवपूर्वक केलं. कारण त्यांना हे आंदोलन मोडून काढण्यासाठी दि. बा. पाटील यांचं मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करायचं होतं.
दि. बा. पाटील यांच्यावर गुन्हेगारी कायद्यानुसार हिंसाचार करण्याची केस दाखल करण्यात आली, पण पाटीलसाहेबांनी आपल्यावरील हे सारे आरोप फेटाळून लावत न्यायालयासमोर पुराव्यासह वस्तुस्थिती सांगितली. त्यामुळे न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली. पोलिसांचा हिरमोड झाला. त्यांचे मनसुबे ढासळले.
न्यायालयातून पाटीलसाहेब बाहेर पडून काही अंतर चालत गेले आणि आपल्याबरोबरच्या सहकार्‍यांना पनवेलला जाण्यासाठी गाडी आणायला सांगितले.इतक्यात काही पोलीस अधिकार्‍यांनी त्यांना गाठले आणि तुम्हाला पुन्हा अटक करण्यात येत आहे, असं सांगितलं. पाटीलसाहेब चिडले. ते म्हणाले, आताच माझी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आणि तुम्ही मला पुन्हा कशासाठी, कोणत्या गुन्ह्याखाली अटक करीत आहात? पण पोलीस त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत होते. त्यांच्या प्रश्नाला उत्तर न देता बळजबरीने त्यांना पोलीस गाडीत बसवण्याचा प्रयत्न करीत होते. एवढ्यात आणखी काही पोलीस अधिकारी आले व त्या सर्वांनी पाटीलसाहेबांना अक्षरशः धक्के देत फरफटत गाडीत ढकलले. हा सारा प्रकार पाहून त्यांचा रक्तदाब वाढला, त्यांची शुद्ध हरपली.
पोलिसांनी ‘दिबां’ना उरणच्या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल केले आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबईत सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये नेले. पहाटे त्यांना शुद्ध आली. तेव्हा डॉक्टरांना विचारले असता त्यांना कळले की आपल्याला मुंबईत आणले आहे.
इकडे शेवे गावात पोलिसांनी बेदम मारहाण करून ज्या शेतकर्‍यांना अटक केली होती, त्या शेतकर्‍यांची आठ-नऊ दिवसांनी ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली, मात्र त्यातील पाच-सहा शेतकर्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला, पण न्यायालयाने त्यांचीही 20 दिवसांनी निर्दोष मुक्तता केली.
पाटीलसाहेब हॉस्पिटलमध्ये असताना शेतकरी आंदोलनाची धग पेटतच होती.उरण-पनवेल परिसराला पोलीस आणि एसआरपींचा गराडा पडला होता. त्यामुळे आंदोलनात सहभागी असणार्‍या पुढार्‍यांची पोलिसांंकडून धरपकड सुरू होती. जनार्दन भगत, दत्तूशेठ पाटील, कमळाकर ठाकूर, अनंताशेठ पाटील, गणूशेठ घरत अशा अनेक नेत्यांना पकडून त्यांना नाशिकच्या तुरुंगात ठेवण्यात आले.
पोलिसांना वाटलं आता या आंदोलनाचे नेते अटकेत असल्याने आंदोलन बारगळेल. सरकारला त्यांची शेतजमीन संपादन करणं सोपं जाईल, पण शेतकरी, शेतमजूर, गावकरी पोलिसांच्या दडपशाहीला, अत्याचाराला कंटाळले होते. त्यांचा राग अनावर झाला होता. काहीही झाले तरी आपल्या शेताला हात लावू द्यायचा नाही. सरकारला एक इंचही जमीन देणार नाही, या निश्चयाने ते या लढ्यात उतरत होते.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply