मोदी सरकारचा शेतकर्यांसाठी मोठा निर्णय
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
मोदी सरकारने देशातील शेतकर्यांना दिलासा देत खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि. 9) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली.
भातावरील एमएसपीमध्ये 72 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे 1868 रुपये प्रतिक्विंटल भात आता 1940 प्रतिक्विंटल झाला आहे. बाजरीवरीलदेखील एमएसपी वाढवण्यात आल्याने बाजरी प्रतिक्विंटल 2150 रुपयांवरून 2250 रुपये प्रतिक्विंटल झाली आहे. त्या खालोखाल तूर आणि उडीद डाळीला 300 रुपये प्रतिक्विंटल तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वाधिक वाढ तिळाला देण्यात आली. तिळाचे भाव 452 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आले.
कृषिमंत्री म्हणाले, गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. चालू खरीप हंगामासाठी 2020-21 (6 जून 2021पर्यंत) गेल्या वर्षीच्या 736.36 एलएमटीच्या तुलनेत एमएसपीवर 813.11 एलएमटीपेक्षा जास्त धान्य येथे खरेदी केले गेले. त्यामुळे 120 लाखांपेक्षा अधिक शेतकर्यांना फायदा झाला आहे.