Breaking News

संपत्ती निर्मितीचा नवा खेळ आणि खेळाचे नवे नियम!

नव्या जगाने संपत्ती निर्मितीचा नवा खेळ तयार केला आणि त्याचे नियमही. तो खेळ आणि त्याचे नियम आपण स्वीकारलेच नसते तर शेअर बाजाराची एवढी चर्चा करण्याची गरजच नव्हती. पण तो खेळ आणि त्याचे नियम ही नव्या जगाची अपरिहार्यता बनली. हा खेळ त्या नियमांनुसार खेळणे, हे नव्या जगात बंधनकारक आहे. त्यामुळे आपल्याला आज शेअर बाजार किंवा भांडवली बाजाराची चर्चा करणे, क्रमप्राप्त झाले आहे.
शेअर बाजाराविषयी आपले मत काय आहे? तो सट्टाबाजार आहे? तो पैसे कमावण्याचे भांडवलशाहीचे हत्यार आहे? तो श्रीमंतांचा पैसे कमवण्याचा डाव आहे? आपल्यापैकी अनेकांचे असेच मत असणार आणि माझेही तसेच होते. पण जेव्हा त्याची अधिकाधिक माहिती मिळत गेली, तसे माझे मत बदलत गेले. लाखो भारतीय नागरिकांनीही त्यांचे शेअर बाजाराविषयीचे आपले हे मत बदलले, म्हणून गेले काही वर्षे आपल्या देशात त्या क्षेत्रात एक मोठा बदल होतो आहे. तो बदल असा आहे, ज्यात भारतीय गुंतवणूकदार गुंतवणुकीच्या या मार्गाचा स्वीकार करत आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे जो भारतीय शेअर बाजार आतापर्यंत परकीय गुंतवणूकदारच नियंत्रित करत होते, त्यावर 2018 साली प्रथमच भारतीय गुंतवणूकदारांनी काही अंशी नियंत्रण मिळविले आहे. आणि कोरोना साथीच्या संकटात तर शेअर बाजारातील भारतीय गुंतवणूकदारांची संख्या अधिकच वाढली आहे. ज्या भांडवली बाजारावर जगाचे आर्थिक व्यवहार ठरतात, त्याचा विचार करता हा फार मोठा बदल आहे.
भांडवल उभारणीचा सर्वमान्य मार्ग
शेअर बाजारात काय होते, हे आधी समजून घेतले पाहिजे. मोठ्या उद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी जेव्हा भांडवल लागते, तेव्हा त्यांना आपल्या उद्योगाची वर्षानुवर्षे चांगली प्रतिमा तयार करावी लागते. या उद्योगातून पुढे चांगला नफा मिळणार आहे, हे गुंतवणूकदारांना पटवून द्यावे लागते. भांडवल उभे राहण्यासाठी ते खुल्या बाजारात जातात, ज्याला आयपीओ म्हणतात. ज्यांना या उद्योगाच्या भरभराटीची खात्री वाटते, ते नागरिक अशा कंपनीत गुंतवणूक करतात, म्हणजे त्या उद्योगाला भांडवल पुरवितात. अशा गुंतवणुकीतून उद्योग उभा राहातो. या उद्योगातून जसजसा नफा मिळतो, तसतसा गुंतवणूकदारांना त्यातील वाटा वेगवेगळ्या स्वरुपात दिला जातो. अर्थात, उद्योग सुरु करणे, हे धाडस असते, त्यामुळे त्यात नफाच होईल, असे सांगता येत नाही. त्यामुळे त्यात जर तोटा झाला तर त्या उद्योगाचे शेअर जवळ बाळगणार्‍या शेअरधारकांना त्याचा तोटाही सहन करावा लागतो.
परकीय प्रभाव कमी होण्याची सुरुवात
आज आपल्या देशातील रिलायन्स, इन्फोसिस, टीसीएस, एचडीएफसी, स्टेट बँक, विप्रो, महिंद्रा असे आणि सुमारे पाच हजार छोटेमोठे उद्योग या मार्गाने उभे राहिले असून त्यातून लाखो रोजगार निर्माण झाले आहेत. आपल्यातीलच ज्या नागरिकांना या उद्योगांचे आकलन आणि अपरिहार्यता लक्षात आली आहे, ते नागरिक अशा उद्योगात गुंतवणूक करतात आणि त्यातून पैसा मिळवितात. त्यातील काही जण इतका पैसा मिळवितात की, तितका पैसा इतर कोणत्याच मार्गाने मिळू शकत नाही. अर्थात, त्यातील अनेक जण केवळ गुंतवणूक न करता त्यात जोखीम स्वीकारून ट्रेडिंग करतात, जी सट्टा खेळल्यासारखी असते. आपण येथे ज्या गुंतवणुकीविषयी विचार करतो आहोत, त्यात शेअर बाजारातील ट्रेडिंग आपण गृहीत धरलेले नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करणारी नवीमंडळी अतिलोभातून ट्रेडिंग करतात आणि त्यात फटका बसला की, या गुंतवणुकीला बदनाम करतात. पण गेल्या दशकात त्यात खूपच सुधारणा झाली असून आता भारतीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक तसेच म्युच्युअल फंडात म्हणजे शेअर बाजारात अप्रत्यक्ष गुंतवणूक करण्याचा सुरक्षित मार्ग पत्करण्यास सुरवात केली आहे. त्याचाच परिणाम म्हणजे जेव्हा जेव्हा परकीय गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून पैसा काढून घेतात, तेव्हा शेअर बाजार पूर्वीसारखा कोसळत नाही, असा अलीकडच्या चार पाच वर्षांचा अनुभव आहे. याबदलाचे महत्व यासाठी आहे की, हे आपल्या देशात प्रथमच होत आहे.
आधुनिक जगाचा ठोकताळा
हा बदल चांगला की वाईट, याचे ‘हो’ किंवा ‘नाही’, असे उत्तर मात्र देता येत नाही. हा बदल अपरिहार्य आहे, एवढे मात्र खात्रीने म्हणता येते. भारतीय आतापर्यत जमीन, सोने, घरे या मार्गाने गुंतवणूक करत होते आणि अजूनही करतात. पण जगाने विशेषतः विकसित जगाने आपल्याला बार्टर पद्धत सोडून कागदी आणि आता डिजिटल चलनाचा खेळ खेळण्यास भाग पाडले, त्याचा विचार करता हा खेळ जिंकणारा भौतिकदृष्ट्या सुखी होतो, हा आधुनिक जगाचा ठोकताळा झाला आहे. विकसित देशांत बँकिंगच्या आणि भांडवली बाजाराच्या मदतीने चलन सारखे फिरत राहिले. त्यामुळे त्या देशात संपत्तीची निर्मिती आपल्यापेक्षा कितीतरी वेगाने झाली आणि तेथे भौतिक समृद्धी आली. आपल्या देशात मात्र जमीन, सोने, घरे यात चलन अडकून राहिले. त्यामुळे काही मोजके नागरिक श्रीमंत झाले खरे, पण चलन फिरत नसल्याने ती भौतिक समृद्धी, हे बहुतांश नागरिकांसाठी साध्य होऊन बसले. त्यामुळे आपण आज भौतिक समृद्धीसाठी धडपडत आहोत.
अनेक भारतीय संभ्रमातून बाहेर
थोडक्यात, नव्या जगाने संपत्ती निर्मितीचा नवा खेळ तयार केला आणि त्याचे नियमही बनविले. तो खेळ आणि त्याचे नियम आपण स्वीकारलेच नसते तर शेअर बाजाराची एवढी चर्चा करण्याची गरजच पडली नसती. पण तो खेळ आणि त्याचे नियम ही नव्या जगाची अपरिहार्यता बनली. तो त्या नियमांनुसार खेळणे, हे नव्या जगात बंधनकारक आहे. त्यामुळे आपल्याला आज शेअर बाजार किंवा भांडवली बाजाराची चर्चा करणे, क्रमप्राप्त आहे. हा खेळ आणि त्याचे नियम विकसित देशातील नागरिकांनी स्वीकारले आणि आपले गुंतवणुकीचे मार्ग त्यानुसार बदलून केवळ वैयक्तिक जीवनातच नव्हे तर सार्वजनिक जीवनातही भौतिक समृद्धी प्राप्त केली. भारतीय समाज मात्र गेले किमान एक शतक, हा खेळ खेळायचा की नाही, या संभ्रमात आहे. 2018 पासून भारतीय शेअर बाजारात भारतीय गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढली, याचा अर्थ काही भारतीय नागरिकांच्या मनातील तो संभ्रम दूर झाला. त्यांनी आधुनिक जगासोबत जाण्याचा अपरिहार्यता मान्य केली.
आर्थिक व्यवहार संघटित होत आहेत
आपल्या देशात संपत्तीचे वितरण होत नाही, त्यामुळे आर्थिक विषमता वाढतेच आहे, याविषयी आपण नेहमीच बोलतो. पण हे वितरण कसे शक्य होईल, ते घडवून आणण्याचा मार्ग मात्र आपण सांगत नाही. असा खात्रीचा मार्ग आहे करपद्धती सुलभ करून जास्तीतजास्त नागरिकांकडून कमीतकमी कर घेणे. जितका कमी आणि सोप्या पद्धतीने कर घेतला जाईल, तितका कर महसूल वाढेल आणि ज्यांच्यापर्यंत संपत्ती पोचण्याची गरज आहे, ती सरकारच्या मार्गाने पोचेल. अर्थक्रांती त्यासाठी बँक व्यवहार कराची मांडणी करते. संपत्ती वितरणाचा दुसरा मार्ग आहे, तो आर्थिक व्यवहार अधिकाधिक संघटीत करणे. (अधिक मूल्याच्या नोटा कमी करणे, बँकिंगला आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे, सोने, जमीन, घरे यातील पैसा फिरत नसल्याने त्यातील गुंतवणूक कमी करून विमा, निवृत्ती, म्युच्युअल फंड यातील गुंतवणूक वाढवून तो खेळता ठेवणे आणि या मार्गाने व्याजदर जगाच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न करणे.) आर्थिक व्यवहार संघटीत यासाठी केले पाहिजेत की तसे केल्यानेच ते पारदर्शी होण्याची आणि त्यांचे योग्य नियोजन केले जाण्याची शक्यता आहे. अधिकाधिक भारतीय नागरिकांना ही गोष्ट कळू लागली आणि त्यानुसार ते आपल्या गुंतवणुकीच्या सवयीत बदल करत आहेत, हे त्यांच्या आणि देशाच्या दृष्टीने पुढचे स्वागतार्ह पाउल आहे. अर्थात, शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची ही शिफारस नव्हे. ज्याला हे पटले, त्याने योग्य सल्लागाराच्या मार्फत माहिती घेऊनच हा मार्ग अवलंबला पाहिजे. कारण गुंतवणुकीच्या प्रत्येक मार्गात जोखीम ही असतेच. तशी ती शेअर बाजाराची गुंतवणूक योग्य पद्धतीने केली नाही तर अधिक आहे, याचे भान ठेवलेच पाहिजे.

  • यमाजी मालकर
    ymalkar@gmail.com

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply