पनवेल : वार्ताहर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी कृती संघर्ष समितीच्या वतीने विशाल असे मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांनी स्व. दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला दिले जात नाही तोपर्यंत आमचा हा संघर्ष सुरूच राहील असे ही त्यांनी सूचित केले. या आंदोलनात स्थानिक भूमिपुत्र नागरिक, हजारो भाजप कार्यकर्ते, सर्वपक्षीय कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते व त्यांनी आपल्या भावना तीव्रपणे मांडल्या. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी उपमहापौर विक्रांत पाटील हे शेकडो कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते. बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, स्व. दि. बा. पाटील हे निःश्ययाचा महामेरू होते. शेतकर्यांच्या कल्याणाचा एखादा विषय ठरवला तर तो मार्गी लावायचाच हा त्यांचा संघर्षशील स्वभाव होता. अनेक कार्यक्रम आणि आंदोलने यात स्व. दि. बा. पाटील साहेबांचा मला सहवास लाभला आणि त्यांच्याबरोबर मी काम करू शकलो हे माझे भाग्य आहे. स्व. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे हिमालया इतक्या उंचीचे नाव आहे, तसेच ते उभ्या महाराष्ट्रासाठी अस्मितेचा विषय आहेत. त्यांचे नाव महाराष्ट्रातील अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमाला देता येऊ शकते, तसेच समृध्दी महामार्गाला त्यांचे नाव दिले गेलेले आहे, परंतु हे विमानतळ ज्या जागेत उभे राहत आहे तो संपूर्ण विभाग हा स्व. दि. बा. पाटील यांची कर्मभूमी आहे, त्यांच्या संघर्षामुळे आज या विभागाचा विकास झाला आहे. त्यामुळे अशा संघर्षशील नेत्याचेच नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जावे ही आग्रही मागणी आम्ही करीत आहोत. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले की, स्व. दि. बा. पाटील हे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते, त्यांनी त्यांच्या असाधारण कार्यातून या विभागातील तमाम युवा पिढीच भवितव्य उज्वल करण्याचे काम केले आहे. आज या विभागातील शेतकर्यांचा जो विकास झालेला दिसतो तो केवळ आणि केवळ स्व. दि. बा. पाटील यांच्यामुळेच. महाविकास आघाडीने उगाचच राजकारण न करता खाल्या मिठाला जागले पाहिजे आणि ज्यांच्यामुळे आमदार, खासदार झाले महत्त्वाच्या पदांवर पोहचले त्यांच्या नावाला विरोध न करता समर्थन दिले पाहिजे, असेही मत विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …