Breaking News

सर्वात मोठ्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा 20 जुलैला पारितोषिक वितरण समारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त
शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 23व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. 20) सायंकाळी 04 वाजता मुंबईत मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकासमोरील मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, सुप्रसिद्ध कवियत्री व लेखिका सौ. नीरजा, माध्यम सल्लागार जयु भाटकर यांची उपस्थिती लाभणार आहे.
वाचन संस्कृतीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण असलेल्या या सोहळ्याचा साहित्यप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, स्पर्धा समन्वयक दीपक म्हात्रे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी केले आहे.
असे आहे बक्षिसांचे स्वरूप
राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमधील विजेत्या प्रथम क्रमाकांस एक लाख रुपये, व्दितीय क्रमाकांस 50 हजार, तर तृतीय क्रमाकांस 30 हजार रुपये तसेच आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील उत्कृष्ट कथेसाठी सात हजार रुपये, उत्कृष्ट कविता, उत्कृष्ट व्यंगचित्र, उत्कृष्ट विशेषांक व उत्कृष्ट मुखपृष्ठ यांना प्रत्येकी पाच हजार रुपये, बालसाहित्याच्या सर्वोत्कृष्ट अंकास 7500 रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातून प्रकाशित होणार्‍या दिवाळी अंकांसाठी खास पारितोषिके देण्यात येणार असून यामध्ये प्रथम क्रमांकास 40 हजार रुपये, व्दितीय क्रमांकास 20 हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास 10 हजार रुपये, दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी पाच हजार रुपये आणि सर्व पुरस्कारप्राप्त अंकांना सन्मानचिन्ह असे बक्षिसांचे स्वरूप आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply