पनवेल ः प्रतिनिधी
रोटरी क्लबच्या माध्यमातून खर्या अर्थाने पनवेलची जी सेवा होते त्याबद्दल कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच उरले नसल्याचे गौरवोद्गार भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 25) खांदा कॉलनीत बोलताना काढले. ते रोटरी क्लबच्या कार्यक्रमात बोलत होते.
रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन सिनर्जी पार्टनर्स आणि खांदा कॉलनीतील नेत्रज्योत आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपकरणांचा लोकार्पण सोहळा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.
या सोहळ्यास ‘रोटरी’च्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रश्मी कुळकर्णी, डीआरएफसी डॉ. गिरीश गुणे, आयकर आयुक्त संजय देशमुख, नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेविका सीता पाटील, क्लब अध्यक्ष हरमेश तन्ना, सचिव कल्पेश परमार, प्रोजेक्ट संपर्क अधिकारी डॉ. जनार्दन, नेत्रज्योत आय हॉस्पिटलचे ट्रस्टी, डॉक्टर्स आदी उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, आपण रोटरी क्लबचा सदस्य असल्याचा अभिमान वाटतो. त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्याकडून आम्हा राजकीय क्षेत्रात काम करणार्यांना स्फूर्तिदायक कितीतरी गोष्टी आहेत हे सांगण्यासाठी आता माझ्याकडे शब्दच नाहीत. या प्रोजेक्टसाठी मोतीबिंदूचे रुग्ण शोधण्यासाठी ग्रामीण भागात, आदिवासी किंवा शहरातील गरीब वस्तीत जाऊन काम करावे लागेल. कारण अशा व्यक्ती तपासणीसाठी वेळ काढू शकणार नाहीत आणि हा खर्च करणे परवडणार नाही, अशी भीती त्यांना वाटते. त्यामुळे ते दुखणी अंगावर काढत असतात. या लोकांपर्यंत पोहचावे लागणार आहे. त्यासाठी एखादी योजना करणे आवश्यक असून रोटरीने प्रोजेक्ट हातात घेतल्यावर तो ते पूर्ण करतात. या प्रोजेक्टला मिळालेली ग्लोबल ग्रँट ही तुमच्या केलेल्या कामाला मिळालेली दाद आहे.
या वेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रश्मी कुळकर्णी, डीआरएफसी डॉ. गिरीश गुणे, आयकर आयुक्त संजय देशमुख यांनीही आपले अनुभव सांगितले व शुभेच्छा दिल्या.
Check Also
शेकाप माजी नगरसेवक सुनील बहिराचा भाचा रूपेश पगडेच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या
महिलांना जबरी मारहाण व दमदाटी भोवली पनवेल : रामप्रहर वृत्त बांधकाम मटेरियल सप्लायवरून वाद करीत …