मुंबई, नागपूर ः प्रतिनिधी
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली असून नागपूरसह मुंबईच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून एकीकडे
देशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी छापा टाकण्यात आलेला असताना दुसर्या टीमने वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला आणि झाडाझडती घेतली.
ईडीने शुक्रवारी (दि. 25) सकाळी अनिल देशमुख यांच्या नागपुरातील जीपीओ चौकातील निवासस्थानी तसेच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. 16 जूनला ईडीच्या तीन पथकांनी देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापार्याच्या घरीही छापे टाकले होते. त्यानंतर ईडी देशमुख यांच्याकडेही झाडाझडती घेण्याची शक्यता बळावली होती. अवघ्या नऊ दिवसांतच ईडीने हा छापा टाकला. देशमुख यांच्या मुंबईतील निवासस्थानीही ईडीकडून छापेमारी झाली. वरळीतील सुखदा इमारतीमधील देशमुख यांच्या घरात सकाळीच ईडीचे पथक पोहचले व झाडाझडती सुरू झाली.
11 मे रोजी ईडीने मनी लॉण्डरिंगप्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दुसरीकडे सीबीआयनेही देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सीबीआयकडून देशमुख यांची चौकशीही करण्यात आली. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरचा अभ्यास केल्यानंतर ईडीने गुन्हा दाखल करीत कारवाईला सुरुवात केली होती.
देशमुख यांनी दरमहा 100 कोटींची खंडणी गोळा करण्याची सूचना निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंसह अन्य अधिकार्यांना दिली होती. पोलीस अधिकार्यांची बदली प्रक्रिया, नियमित कामकाजातही देशमुख यांचा हस्तक्षेप वाढला होता, असे आरोप करणारे पत्र मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मेच्या सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …