Breaking News

कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी विवेक पाटलांच्या कोठडीत वाढ

‘डोळस प्रजा’ पाठीशी असलेला ‘कथित राजा’ जेलमध्येच!

मुंबई ः रामप्रहर वृत्त
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले बँकचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांची कोठडी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी कोर्टाने 28 जूनपर्यंत वाढविली आहे, मात्र तरीही ‘डोळस’ असलेले चिपळेवासी अजूनही या ‘कथित राजा’च्या वाढदिवशी त्याच्या पाठीशी असल्याचे फलक झळकवत आहेत. कर्नाळा बँकेत धडधडीत भ्रष्टाचार आणि कोट्यवधींचा घोटाळा होऊनही चिपळे ग्रामस्थांचे डोळे कसे उघडले नाहीत याबाबत सामान्य नागरिक सखेद आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
कर्नाळा बँकेतील 529 कोटी 36 लाख 55 हजार 36 रुपयांच्या (राज्य सीआयडीच्या मते 543 कोटी रुपयांच्या) घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना 15 जून रोजी पनवेलमधील राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. या घोटाळ्यामुळे सामान्य खातेदार, ठेवीदारांपासून ते कर्नाळा बँकेत पैसे ठेवणार्‍या पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींचेही पैसे अडकून पडले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शेकाप कार्यकर्त्यांसह शेकापच्या वर्चस्वातील ग्रामपंचायतींचाही सहभाग आहे.
एवढा भ्रष्टाचार होऊनही चिपळे गावातील ग्रामस्थांनी मात्र विवेक पाटील यांच्या वाढदिवशी गावात होर्डिंग लावून अटकेत असलेल्या या माजी आमदाराला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘साहेब, आम्ही कालपण तुमच्यासोबत होतो, आजपण तुमच्यासोबत आहोत आणि कायम तुमच्यासोबत राहणार आहोत’, असे या होर्डिंगवर लिहिलेले आहे. सामान्य खातेदारासह ग्रामस्थ मंडळी, ग्रामपंचायती आणि इतर खातेदारांचे पैसे कर्नाळा बँकेतील घोटाळ्यामुळे अडकले असूनही त्याला जबाबदार असलेल्या मुख्य सूत्रधारालाच चिपळेकर ग्रामस्थ शुभेच्छा देत असल्याने इतर सूज्ञ लोक मात्र अवाक् झाले आहेत.
कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे हे प्रकरण कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी आणि कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांनी धसास लागले आहे. विवेक पाटील यांना आता 28 जून रोजी सकाळी 11 वाजता ईडी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply