नवी मुंबई ः बातमीदार
लडाखमधील गलवान क्षेत्रात चीनने युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली. त्यानंतर चीनला भारताने जशाच तसे उत्तर दिल्यानंतर चीनने नमते घेतले. चीनला संपूर्ण देशानेही जशाच तसे उत्तर देण्याची हीच वेळ आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने याकरिता आपले योगदान देणे गरजेचे आहे. याकरिता नवी मुंबई भाजपतर्फे व्यापारी बांधवांना चिनी बनावटीच्या वस्तूंची विक्री न करण्याचे आवाहन करण्यात आले, तसेच समाजमाध्यमांतूनही चिनी वस्तू ग्राहकांनी न घेण्याचे तसेच व्यापार्यांनी न विकण्याचे आवाहन करण्यात आले. भाजपचे मीडिया सेल नवी मुंबईचे महासचिव प्रमित सरण यांनी हा उपक्रम सीवूड्स, नवी मुंबई येथे राबविला.
याबाबत नवी मुंबईतील दुकानांना निवेदन देण्यात आले असून संपूर्ण खारघर भागात ही मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. रक्षाबंधनावेळी मोठ्या प्रमाणात चिनी बनावटीच्या राख्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. चिनी बनावटीच्या वस्तू खरेदी केल्यास हा पैसा चीनकडे जातो. त्याचा वापर आपल्याविरोधात युद्धासाठी होतो. याकरिताच चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याची हीच वेळ आहे. शहरातील व्यापार्यांना चिनी बनावटीच्या राख्या तसेच इतर वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी निवेदन देण्यात आले. चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी भारत रक्षा मंचच्या वतीने जनजागृती मोहीम प्रत्यक्ष तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून यापुढेही अशीच राबविली जाणार आहे.