वंचित बहुजन आघाडीचा 5 जुलैला विधान भवनावर मोर्चा
मुंबई ः प्रतिनिधी
मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा धगधगत असताना आता मुस्लिमांच्या आरक्षणाचा मुद्दाही चर्चेत येऊ लागला आहे. मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण द्यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि रझा अकादमी येत्या 5 जुलैला विधान भवनावर भव्य मोर्चा काढणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत ही घोषणा केली.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत निर्णय दिला असला तरीही मुस्लिमांच्या आरक्षणाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. असे असताना धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणार्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने अजूनही मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेले नाही. याच कारणासाठी येत्या 5 जुलैला विधान भवनावर राज्य सरकारविरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाचे संकट आहे. कोरोनाच्या लाटांवर लाटा येऊ लागल्या आहेत, मात्र असे असले तरी आम्ही मोर्चा काढणारच, असा निर्धार आंबेडकर यांनी या वेळी व्यक्त केला.
कोर्टाने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण मान्य केलेले आहे, मात्र राज्य सरकारने अद्याप ते जाहीर केलेले नाही. आता सरकारने ते द्यावे, असे आवाहनही आंबेडकर यांनी केलेे.