मुंबई : प्रतिनिधी
पदोन्नतीमधील आरक्षण यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी येत्या 6 जुलै रोजी आझाद मैदानात निदर्शने आंदोलन करणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार निदर्शने आंदोलन अयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे. अनुसूचित जाती जमातींना आणि इतर मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे, मराठा समाजाच्या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा कायम पाठिंबा असून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकलेच पाहिजे. ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित ठेवाव्यात. तसेच मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे 6 जुलै रोजी दुपारी 1 वाजता मुंबईत आझाद मैदान येथे निदर्शने आंदोलन आयोजित केले आहे, अशी माहिती गौतम सोनवणे यांनी दिली आहे. पदोन्नतीमधील आरक्षणासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे 1 जून ते 7 जूनदरम्यान राज्यभर आंदोलन सप्ताह पाळण्यात आला. आंदोलन सप्ताहाचा समारोप मुंबईत बोरिवली तहसील कार्यलयावर रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे आणि आयोजक जिल्हा अध्यक्ष हरीहर यादव यांच्या नेतृत्वात आंदोलन करून करण्यात आला.