Monday , February 6 2023

जोकोव्हिच, बार्टी उपांत्यपूर्व फेरीत

विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा

लंडन ः वृत्तसंस्था
सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि ऑस्ट्रेलियाची अ‍ॅश्ले बार्टी या अग्रमानांकित खेळाडूंनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर आंद्रेस रुब्लेव्ह, कोको गॉफ, बाबरेरा क्रेजिकोव्हा आणि इशा श्वीऑनटेक यांना उपउपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.
जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या जोकोव्हिचने 17व्या मानांकित ख्रिस्तियन गॅरिनला 6-2, 6-4, 6-2 अशी सरळ तीन सेटमध्ये धूळ चारली. हंगेरीच्या बिगरमानांकित मार्टन फुस्कोव्हिसने पाचव्या मानांकित रुब्लेव्हला 6-3, 4-6, 4-6, 6-0, 6-3 असे तब्बल पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत नमवले.
कॅनडाच्या 10व्या मानांकित डेनिस शापोवालोव्हने स्पेनच्या आठव्या मानांकित रॉबटरे बटिस्टा अगुतचा 6-1, 6-3, 7-5 असा तीन सेटमध्ये पराभव केला. खाचानोव्हने सबास्टियन कोर्डावर 3-6, 6-4, 6-3, 5-7, 10-8 अशी मात केली.
महिलांमध्ये बार्टीने काही आठवड्यांपूर्वी फ्रेंच स्पर्धा जिंकणार्‍या क्रेजिकोव्हावर 7-5, 6-3 असा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. दुसर्‍या मानांकित आर्यन सबालेंकाने 18व्या मानांकित एलिना रायबॅकिनाला 6-4, 4-6, 6-3 असे हरवले. ट्युनिशियाच्या 21व्या मानांकित ऑन्स जॅबीर हिने पोलंडच्या सातव्या मानांकित श्वीऑनटेकवर 5-7, 6-1, 6-1 अशी पिछाडीवरून सरशी साधली. जर्मनीच्या 25व्या मानांकित अँजेलिक कर्बरने अमेरिकेच्या किशोरवयीन गॉफवर 6-4, 6-4 असे वर्चस्व गाजवले. याशिवाय चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हानेसुद्धा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply