कर्जत : बातमीदार
राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना दुष्काळाची झळ माथेरानकरांना बसू नये यासाठी नगरपालिकेकडून या संपूर्ण डॅमकडे जाणारे रस्ते, पाण्याची पातळी, गाळ काढण्याचे काम, होत असलेले सुशोभीकरण याची पाहणी करण्यात आली.
माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, मुख्याधिकारी रामदास कोकरे, बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांनी संयुक्त पाहणी केली. माथेरानमध्ये येणारा पर्यटक या शारलोट डॅमला अवश्य भेट देत असतात, तसेच या डॅममधूनच माथेरानला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पर्यटन हंगामात पाणीपुरवठ्याची स्थिती जाणून घेतली व 60 खोली असलेल्या डॅममध्ये 28 फूट पाणी शिल्लक असल्याने समाधानही व्यक्त केले.
या डॅमकडे जाणारा रस्ता हा क्ले पेव्हरब्लॉकचा होणार असल्याने या रस्त्याची गटारे, रस्ता बीएमडब्ल्यूची स्थिती यांची विशेष पाहणी करण्यात आली व लवकरच या रस्त्याची धूप थांबून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक पर्यटक यांना चालण्याजोगा होणार आहे. या डॅमच्या पुलावर पेव्हरब्लॉकचे काम अपूर्णावस्थेत होते. यासाठी वारंवार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला होता. त्या पुलावरील ब्लॉकच्या कामाची पाहणी केली गेली. याबाबत नगरपालिकेच्या ठेकेदाराला संबंधित सूचनाही देण्यात आल्या.