नवी मुंबई ः प्रतिनिधी
कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर 50पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या दीडशेच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे तिसर्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत पालिका प्रशासनाने पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. त्या अनुषंगाने दैनंदिन चाचण्यांवर भर दिला जात आहे. रविवार वगळता गेल्या काही दिवसांपासून सरासरी दिवसाला आठ हजार कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. शहरात वर्षभरात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या एक लाखाच्या पुढे गेली असून कोरोनामुळे आतापर्यंत 1700पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दुसरी लाट प्रचंड वेगाने वाढल्याने शहरातील आरोग्य व्यवस्था तोकडी पडल्याने अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. आता शहरात पुन्हा रुग्णवाढ होत असल्याने तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेत प्रशासनाने तयारी केली आहे. यासाठी खाटांची संख्या वाढविण्याबरोबरच दुसर्या लाटेत मोठी समस्या निर्माण झालेला प्राणवायू पुरवठा कमी पडणार नाही याची काळजी घेतली जात आहे. यासाठी नुकताच पालिकेने प्राणवायू संकलन व सीटी स्कॅन सुविधा सुरू केली आहे. आरोग्य व्यस्थेबरोबर तिसरी लाट पसरू नये यासाठी पालिकेने नियोजन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सहा ते सात हजारांपर्यंत असलेली कोरोना चाचण्यांची संख्या 10 हजारांपर्यंत वाढविण्यात आली आहे. यातून जास्तीत जास्त बाधित समोर येतील व त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू होतील अशी दक्षता घेतली जात आहे, तर संसर्ग अधिक पसरू नये यासाठी बाधितांच्या संपर्कातील जास्तीत जास्त जणांचा शोध सुरू केला आहे. वारंवार रुग्ण आढळणार्या सोसायट्यांबाबत कडक उपाययोजना करून अशा सोसायट्यांमध्ये सर्वच नागरिकांच्या चाचण्या करण्याकडे लक्ष दिले जात आहे.