Breaking News

स्पेनला नमवून इटली अंतिम फेरीत

युरो कप सेमीफायनलमध्ये पेनल्टी शूटआऊटचा थरार

लंडन ः वृत्तसंस्था
युरो कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्पेनला नमवत इटलीने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 90 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गोल करण्यात यश आले. त्यानंतर अतिरिक्त वेळेतही हीच स्थिती होती. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीने स्पेनचा 4-2ने पराभव केला.
पहिल्या सत्रात दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले होते, मात्र दुसर्‍या सत्रात इटलीने आक्रमक खेळी करीत 60व्या मिनिटाला गोल झळकावला. इटलीच्या इमोबिलने पास केलेला बॉल फेडरिको चिसाने गोलमध्ये रूपांतरीत केला. त्यानंतर स्पेनच्या संघावर दडपण आले. हे दडपण कमी करण्यासाठी स्पेनच्या खेळाडूंची धडपड सुरू होती. स्पेनच्या खेळाडूंना 80व्या मिनिटाला यश आले. स्पेनच्या डि ओएलमोने पास केलेला बॉल अलवारो मोराटाने गोलमध्ये मारला आणि बरोबरी साधली. त्यामुळे दोन्ही संघात विजयी गोल मारण्यासाठी धडपड सुरू झाली, मात्र विजयी आघाडी घेण्यात 90 मिनिटे संपली. त्यानंतर अतिरिक्त वेळ देण्यात आली. त्यातही दोन्ही संघांना विजयी गोल करण्यात अपयश आल्याने सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला.
दोन्ही संघाच्या खेळाडूंना पेनल्टी शूटआऊटमध्ये पहिला गोल करण्यात अपयश आले. त्यानंतर इटलीने तीन गोल केले, तर स्पेनने दोन गोल केल्यानंतर चौथा गोल हुकला. त्यानंतर इटलीच्या जोर्जिन्होने पेनल्टी शूटआऊटमधला विजयी गोल मारला आणि संघाला अंतिम फेरीत पोहचवले.
इटलीने यापूर्वी 1968मध्ये युरो कप जिंकला होता. त्यानंतर त्यांना आतापर्यंत चषक जिंकता आला नाही. यंदाच्या या स्पर्धेत इटली फॉर्मात आहे. अंतिम फेरीत त्यांची इंग्लंड विरुद्ध डेन्मार्क सामन्यातील विजेत्यासोबत लढत आहे. इटलीला अंतिम सामन्यात विजय मिळवत 53 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती घडविण्याची संधी आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply