धोनीच्या सहभागासंदर्भात रैनाची प्रतिक्रिया
चंदिगड ः वृत्तसंस्था
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि माजी डावखुरा फलंदाज सुरैश रैना चांगले मित्र आहेत. हे दोघे आधीपासून आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचे (सीएसके) महत्त्वाचे खेळाडू आहेत. आता रैनाने धोनीविषयी एक प्रतिक्रिया दिली, ज्यामुळे या दोघांची मैत्री किती घट्ट आहे हे समोर आले आहे.
रैनाने म्हटले आहे की, जर पुढील वर्षी धोनी आयपीएल स्पर्धेचा भाग नसेल, तर तोसुद्धा या लीगमध्ये खेळणार नाही. धोनी आणि रैना हे सीएसके फ्रँचायझीचे दोन महत्त्वाचे खेळाडू
आहेत. आयपीएल 2008पासून हे दोघे चेन्नईस्थित फ्रँचायझीसाठी एकत्र खेळले आहेत. धोनीने नुकताच आपला 40वा वाढदिवस साजरा केला आणि असे मानले जातेय की यंदाचा आयपीएल त्याचा शेवटचा हंगाम असू शकतो.
न्यूज 24 स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत रैना म्हणाला, जर धोनी आगामी आयपीएल हंगामाचा भाग नसेल, तर मलाही आयपीएलचा पुढचा हंगाम खेळण्याची इच्छा नाही. आम्ही 2008पासून एकत्र खेळलो आहोत आणि जर आम्ही यंदा आयपीएल जिंकू शकलो, तर मी पुढच्या हंगामात खेळण्यासाठी त्याला विनंती करेन.
सुरेश रैनाने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनीने निवृत्ती जाहीर केल्याच्या काही क्षणानंतर रैनानेही निवृत्तीची घोषणा केली होती.