पुणे ः प्रतिनिधी
फोटोशूटच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक मंदार कुलकर्णीला अटक करण्यात आली आहे. मंदारने बळजबरी बिकनी फोटोशूट करण्यास भाग पाडल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात 23 ऑगस्टला तिने तक्रार दाखल केली होती. जानेवारीत मंदार आणि पीडित मुलीची भेट एका नाट्य शिबिरादरम्यान झाली होती. दोघांमध्ये मैत्री झाल्यानंतर मंदारने तिला टीव्ही मालिकेच्या ऑडिशनसाठी फोटोशूट करायचे आहे, असे सांगून त्याच्या घरी बोलावले. घरी आल्यानंतर त्याने तिला पाच ड्रेस घालण्यासाठी दिले. त्यातील काही ड्रेसवर फोटोशूट झाल्यानंतर मंदारने तिला बिकिनी घालण्यासाठी दिली. तिने बिकिनीत फोटोशूट करण्यास सुरुवातीस नकार दिला, मात्र तरीही त्याने तिला जबरदस्ती फोटोशूट करण्यास भाग पाडले. फोटोशूट झाल्यानंतर याविषयी घरात कोणाला सांगू नकोस, अशी धमकीही तिला देण्यात आली. मंदारच्या घरातून बाहेर पडल्यानंतर मुलीने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईच्या कानावर घातला. पीडित मुलीच्या आईने मंदारविरोधात तक्रार दाखल करताच कलम 345 अंतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे. मंदारने ’राधा प्रेम रंगी रंगली’, ’पक्के शेजारी’ या मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती, तसेच त्याने ’लग्नबंबाळ’ या नाटकातही काम केले होते.