Tuesday , February 7 2023

गव्हाण विभागातील आशा वर्कर्सना पुन्हा पाच हजारांचे अर्थसाह्य

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून आधार

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या संकटकाळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी चोखपणे सेवा बजावणार्‍या गव्हाण विभागातील 25 आशा वर्कर्सना शनिवारी (दि. 10) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दुसर्‍यांदा प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अर्थसाह्य करण्यात आले. पंचायत समिती सदस्य तथा भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते ही आर्थिक मदत देण्यात आली.
आरोग्य केंद्रातील आशा सेविकांना शासनाकडून तुटपुंजे मानधन मिळते. त्यामुळे कोरोना काळात काम करताना त्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेत गव्हाण विभाग अंतर्गत आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत आशा सेविकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत दोन महिने देण्याचे भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी एका कार्यक्रमादरम्यान जाहीर केले होते.
त्याचप्रमाणे कोरोनाची परिस्थिती वाढल्यास पुढील काळातही मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील मदतीचे वितरण जून महिन्यात करण्यात आले, तर शनिवारी रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते दुसर्‍या महिन्यातील मदत देण्यात आली.
या कार्यक्रमास गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, सदस्य विजय घरत, योगिता भगत, उषा देशमुख, माई भोईर, डॉ. अस्मिता बोराटकर, डॉ. वर्षा धोटे, प्रवीण कोळी आदी उपस्थित होते. दरम्यान, कोरोना देवदूत रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करण्यात आलेले लोकनेता हे पुस्तक या वेळी आशा सेविकांना भेट देण्यात आले, तर अर्थसाह्याबद्दल त्यांनी आभार मानले.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply