
कर्जत ः बातमीदार
नेरळ बाजारपेठ भागातील जमीन मालक आणि भाडेकरू यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे त्या जागेत असलेल्या एका घरावर पिंपळाचे झाड कोसळून घराचे नुकसान झाले. इमारत धोकादायक असल्याने त्या ठिकाणी कोणी राहत नव्हते. परिणामी घरातील साहित्य वगळता अन्य कोणतेही नुकसान झाले नाही.
नेरळ बाजारपेठ भागात प्रफुल्ल ठक्कर हे राहत असून त्यांचे घर ज्या वाड्यात आहे, त्या ठिकाणच्या जागेचा वाद मागील वर्षांपासून सुरू आहे. जमीन मालकाने आपल्या जमिनीमधील धोकादायक झालेली इमारत अर्धवट अवस्थेत तोडून ठेवली आहे. मात्र त्या इमारतीला लागून असलेले पिंपळाचे झाड आजही तसेच होते. जुना वाडा धोकादायक ठरविण्यात आल्याने प्रफुल्ल ठक्कर हे अन्य ठिकाणी राहायला गेले आहेत. रविवारी (दि. 7) जुन्या वाड्याच्या भिंतीत असलेले पिंपळाचे झाड दुपारी सततच्या पावसाने ठक्कर यांच्या घरावर कोसळले. त्यामुळे ठक्कर यांचे घर जवळपास जमीनदोस्त झाले असून घरात कोणी राहत नसल्याने जीवितहानी झाली नाही. नेरळ महसूल तलाठी गायकवाड यांनी घटनास्थळी येऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे.