Breaking News

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा : अर्जेंटिना विजेता; ब्राझील पराभूत

रियो दि जानेरो ः वृत्तसंस्था

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने गतविजेत्या ब्राझीलला हरवत 1-0 अशा फरकाने विजेतेपदावर नाव कोरले. तब्बल 28 वर्षांनंतर या स्पर्धेचा किताब अर्जेंटिनाने जिंकला. कोपा अमेरिका स्पर्धेत नेमारचा ब्राझील आणि लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली खेळणारा अर्जेंटिना हे दोन संघ या चषकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यामुळे दोन्ही संघांकडून विजेतेपद पटकावण्यासाठी कडवी झुंज दिली जाईल, असे बोलले जात होते. अपेक्षेप्रमाणे सामना चुरशीचा झाला. सामन्यातील पहिल्या 20 मिनिटांत दोन्ही संघांत चांगलीच झुंज बघायला मिळाली. दोन्हीकडून तोडूस तोड प्रतिकार केला जात असल्याने कुणालाही गोलपोस्टपर्यंत पोहचता आले नाही. अखेर 22व्या मिनिटाला एंजल डी. मारियाने पहिला गोल नोंदवत अर्जेंटिनाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाने सामन्यात घेतलेली ही आघाडी ब्राझीलला अखेरपर्यंत तोडता आली नाही आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांत झालेल्या लढतीत अर्जेंटिनाने ब्राझीलला पराभव करीत किताबावर नाव कोरले. यापूर्वी 1993 साली अर्जेंटिनाने ही स्पर्धा जिंकली होती. इक्वाडोर येथे झालेल्या अंतिम सामन्यात त्या वेळी अर्जेंटिनाने मेक्सिकोचा 2-1 अशा फरकाने पराभव केला होता. त्यानंतर 2015 व 2016मध्ये अर्जेंटिनाने अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती, मात्र त्यांना चिलीकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदाच्या स्पर्धेत मिळवलेल्या विजयाने अर्जेंटिनाची प्रतीक्षा संपली आहे. या विजयासह अर्जेंटिनाने 15 वेळा किताब जिंकण्याच्या उरुग्वेच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे.

मेस्सीचे स्वप्न साकार

अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनल मेस्सीसाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कर्णधार लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वात संघाने पहिल्यांदाच कोपा अमेरिका स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे, तर मेस्सीने जिंकलेली ही पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. क्लब फुटबॉलमध्ये अनेक किताब जिंकणारा मेस्सी देशाला कोणतीही मोठी स्पर्धा जिंकून देऊ शकला नव्हता. कोपा अमेरिका स्पर्धेतील विजयामुळे त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे.

अभिनंदन अन् सांत्वन!

अर्जेटिनाच्या विजयानंतर लिओनेल मेस्सी आणि त्याचे सहकारी खेळाडू जोरदार सेलिब्रेशन करीत होते. या वेळी एक भावनिक क्षणही पहायला मिळाला जो फुटबॉलच्या आणि खासकरून मेस्सीच्या चाहत्यांना नेहमी लक्षात राहील. पराभव झाल्यानंतर नेमयार हा बार्सोलेनामधील आपला जुना सहकारी मेस्सीला शोधत अर्जेंटिनाच्या खेळाडूंकडे जाताना दिसत होती. एकमेकाला पाहिल्यानंतर दोघांनीही मिठी मारली. एकीकडे नेमयार मेस्सीचे अभिनंदन करीत असताना दुसरीकडे मेस्सी त्याचे सांत्वन करताना दिसत होता.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply