अभियंत्यांचे ग्रामस्थांना आश्वासन; नियोजित मोर्चा तूर्त स्थगित
रसायनी ः प्रतिनिधी
गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील तीन महसुली गावांसह चार आदिवासी वाड्यांचा पाणी प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत. येथील लाडीवली, आकुलवाडी, गुळसुंदे, चिंचेचीवाडी, स्टेशन वाडी, डोंगरीची वाडी, फलाटवाडी यांना जल जीवन मिशन योजनेमधून नवीन योजना कार्यान्वित करून एमआयडीसीचे पाणी घेऊन पुढील चार महिन्यांत ही योजना पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद काढण्यात येणारा मोर्चा तूर्त स्थगित करण्यात आला आहे.
पनवेल तालुक्यातील गुळसुंदे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील गावे व वाड्यांतील नागरिकांना जिल्हा परिषदेच्या सुमारे 52 वर्षे जुन्या व नादुरुस्त चावणे पाणीपुरवठा प्रकल्पाद्वारे पाताळगंगा नदीतील दूषित पाणी जलशुद्धीकरण प्रक्रियेविना तेही आठवड्यातून एक ते दोन वेळा पुरवले जातेे. याबाबत संंबंधित पाणीपुरवठा योजनेचे उपअभियंता, कार्यकारी अभियंता, पनवेल पं.स.च्या गटविकास अधिकारी यांच्याकडे वारंवार तोंडी, लेखी तक्रारी करून प्रसंगी मोर्चे काढूनही नागरिकांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होत नाहीए.
या समस्येबाबत रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांच्याशीही पत्रव्यवहार करूनही मार्ग निघत नसल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी चावणे पाणीपुरवठा योजना बंद करून वरील सर्व गावे व वाड्यांसाठी रसायनी येथील पाताळगंगा एमआयडीसीच्या योजनेतून पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी राष्ट्र सेवा दल संघटनेच्या वतीने 13 जुलै रोजी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्याबाबत जिल्हा संघटक तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर आणि ग्रामस्थांकडून निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर रसायनी पोलिसांकडून जिल्ह्यात जमावंदी आदेश लागू असल्याने मोर्चेकर्यांना नोटिसा देऊन मोर्चा न काढण्याचे आवाहन केले होते.
मोर्चेकरी आंदोलनावर ठाम असल्याचे समजताच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. येझरे, पनवेल पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता श्री. मेटकरी, खालापूर पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता श्री. इंगळे 10 जुलै रोजी लाडीवली येथे पोहचले असता, महिलांनी गावाच्या वेशीवरच चावणे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून येणार्या गढूळ पाण्याची बाटली अधिकार्यांना देत ’हे पाणी तुम्ही प्या साहेब, असे म्हणत संताप व्यक्त करीत अभियंत्यांना फैलावर घेतले.
यानंतर झालेल्या बैठकीत मोर्चेकर्यांच्या मागण्या मान्य करीत यापुढे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत नियमित पाणीपुरवठा करण्यात येईल. संंबंधित गावे व वाड्यांमध्ये तसे वेळापत्रकही लावण्यात येईल. एमआयडीसी पाइपलाइनला चावणे गावाजवळ नवीन टॅपिंग घेऊन जल जीवन मिशनमधून पुनर्जोडणी करण्याच्या कामाचा समावेश आराखडा सन 2020-2021मध्ये प्रस्तावित करून लाडीवली येथे जलकुंभात पाणी साठवून गावे व वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येईल तसेच वितरण व्यवस्थेत आवश्यक पाइपलाइन टाकून शेवटच्या घरापर्यंत पाणी उपलब्ध होईल याची दक्षता घेण्यात येईल यासाठी उद्भव म्हणून एमआयडीसीच्या चावणे गावाशेजारील पाइपलाइनवरून कनेक्शन प्राप्त करण्यासाठी पनवेल पंचायत समिती व संबंधित कार्यालयाकडून नळजोडणी घेणे, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, निविदा व इतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून 10 जुलैपासून पुढील चार महिन्यांत नवीन योजनेतून शुद्ध व शाश्वत पाणीपुरवठा करण्यात येईल, असे लेखी पत्र अधिकारीवर्गाने दिले आणि मोर्चा रद्द करण्याची विनंती येझरे यांनी केली, परंतु या अगोदरचा अनुभव लक्षात घेता हा मोर्चा काही दिवसांसाठी तात्पुरता स्थगित करीत असून यापुढे मात्र असे प्रकार घडल्यास पाणीपुरवठा विभागाच्या विरोधात न्यायालयात जाऊ, असा इशारा देण्यात आला आहे.