पनवेल : वार्ताहर
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये बेकायदेशीर अग्निशस्त्रे व दारू गोळा बाळगणारे, खरेदी-विकी करणार्या व्यक्तींवर विशेष मोहीम राबवुन कारवाई करण्याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी आदेश दिले होते. त्यानुसार नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवती कक्षकडून अवैद्य अग्निशस्त्रे बाळगणार्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या मध्यवती कक्षाला रविवारी (दि. 11) मिळालेल्या गोपनिय बातमीदारामार्फत खारघरच्या बेलपाडा बसस्टॉपजवळ अंदाजे 25 ते 30 वर्षे वयाचे दोन व्यक्ती येणार असून त्यांच्या ताब्यात बेकायदेशीर अग्निशस्त्र व दारूगोळा आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने बेलपाडा बसस्टॉप, खारघर याठिकाणी सापळा लावुन ओमनाथ सोलानाथ योगी (वय 23, रा. जुईगाव, कामोठे, मुळ रा. गडवाई, भिलवाडा, राजस्थान) आणि नंदलाल मेवालाल गुर्जर (वय 30, रा. तुर्भे, नवी मुंबई, मुळ रा. गडवाई, भिलवाडा, राजस्थान) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमध्ये दोन देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व मोबाइल फोन असा एकूण 1,03,800 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.
आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्यांना 14 जुलैपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. आरोपींची अधिक चौकशी सुरू आहे.