Breaking News

लागला एकदाचा निकाल

गेले वर्षभर सुरू असलेला शैक्षणिक खेळखंडोबा एकदाचा संपुष्टात येईल अशी आशा आहे. कोरोनाच्या महासाथीमुळे संपूर्ण शैक्षणिक वर्षाची वाताहत झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शुक्रवारी सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. बराच वेळ वाया घालवल्यानंतर अखेर राज्य सरकारने दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. अंतर्गत मूल्यमापनाच्या जोरावर जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना दहावी बोर्डाने उत्तीर्ण करून टाकले आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात प्रथमच बोर्डाचा निकाल 99.95 टक्के इतका जबरदस्त लागला आहे. याचा अर्थ फक्त 0.05 टक्के विद्यार्थी काही कारणाने उत्तीर्ण होऊ शकले नाहीत.

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत राज्यात सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांहून अधिक मुले-मुली यंदा उत्तीर्ण झाल्यामुळे अकरावीच्या प्रवेशांचे काय करायचे हे एक मोठे आव्हान उभे राहणार आहे. कोरोनाच्या महासाथीमध्ये विद्यार्थी वर्ग सर्वाधिक भरडला गेला. त्यांच्या सोबत त्यांचे पालक देखील मेटाकुटीस आले. शिक्षक वर्गाच्या हालास तर पारावार उरलेला नाही. डोक्यावर अनिश्चिततेची तलवार लटकत असताना परीक्षा घेण्याचा अट्टाहास परवडण्याजोगा नाही असे राज्य सरकारचे मत होते. ते योग्य मानावे लागेल. मुलांच्या परीक्षेपेक्षा त्यांचा जीव अधिक महत्त्वाचा आहे असे स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नोंदवले होते. त्यानंतर भराभर चक्रे हलली आणि सीबीएसई-आयसीएसई बोर्डाने आपापल्या मूल्यमापनाचे फॉर्म्युले जाहीर केले. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा निकालाचा फॉर्म्युला मान्य केला. त्यानंतरही महाराष्ट्राच्या दहावी परीक्षेच्या बोर्डाने आणखी पंधरा दिवस वेळ घेऊन नेमकी कसली चर्चा केली ते गुलदस्त्यातच आहे. अखेर राज्य शिक्षण मंडळाने अंतर्गत मूल्यमापनाचा फॉर्म्युला जाहीर केला. त्यानुसारच आता हे निकाल जाहीर झाले आहेत. शुक्रवारी दुपारी एक वाजता बोर्डाच्या वेबसाइटवर निकाल जाहीर करण्यात येईल व तेथेच विद्यार्थ्यांना आपला निकाल वाचता येईल. त्याचा प्रिंटआऊट देखील काढता येईल असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात या सुविधेचा अक्षरश: बोजवारा उडाला. सायंकाळपर्यंत बोर्डाचे हे संकेतस्थळ (वेबसाइट) काम करेनासे झाले होते. त्यामुळे बहुतेक विद्यार्थ्यांना आपला निकाल संध्याकाळी उशीरपर्यंतही धड कळू शकलेला नव्हता. वर्षभर इतके भोग भोगल्यानंतर विद्यार्थी वर्गाला निकालाच्या दिवशीही अशाप्रकारच्या जीवघेण्या अनिश्चिततेशी सामना करावा लागावा ही दुर्दैवाची बाब आहे. अशा प्रकारचा निकाल महाराष्ट्राने आजवर कधी पाहिलेला नाही आणि यापुढील पिढ्यांवर देखील तशी पाळी येऊ नये. परंतु कोरोनाच्या महासाथीमुळे ही परिस्थिती ओढवल्याने अशा प्रकारचा निकाल जाहीर करावा लागला, हे पालक वर्गाने समजून घ्यायला हवे असेही वाटते. दहावीच्या परीक्षेला एकेकाळी प्रचंड महत्त्व होते. कारण या बोर्डाच्या परीक्षेनंतरच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आपल्या कारकीर्दीचा मार्ग निवडता येई. विज्ञान शाखेकडे जावे की कला शाखेकडे, वाणिज्य शाखेकडे जावे की कुठल्या पदविका अभ्यासक्रमाकडे वळावे असे पर्याय दहावीच्या परीक्षेनंतर खुले होत असत. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. सीईटी परीक्षेसारखे मार्ग आता उपलब्ध आहेत व त्यायोगे आपल्याला हवा तो अभ्यासक्रम निवडता येण्याची मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे दहावीचा निकाल कशाप्रकारे लागला यावर खल करत न बसता भविष्याकडे लक्ष देणे इष्ट ठरेल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निकाल लागला, हाच मोठा समाधानाचा भाग आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply