वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई
पनवेल : वार्ताहर
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून अपघाताला निमंत्रण देणार्या वाहन चालकांवर आरटीओने कारवाई केली. पनवेल, पेण, पिंपरी चिंचवड या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकाने ही मोहीम राबवून नियम मोडणार्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यापुढेही अशाच प्रकारच्या मोहिमा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून राबवल्या जाणार आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करतात. या वेगवान रस्त्यावर वेगमर्यादेचे सर्रास उल्लंघन केले जाते. त्याचबरोबर अवजड आणि इतर वाहनांकडून लेन कटिंग केली जाते. त्याचबरोबर इतर वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. या कारणाने अपघाताला एक प्रकारे निमंत्रण दिले जाते. काही दिवसांपूर्वी बोर घाटात अशाच प्रकारे भीषण अपघात घडला होता. दररोज लहान-मोठे अपघात द्रुतगती महामार्गावर होतात. यामुळे अनेकांचे नाहक बळी जातात. या सर्व दृष्टिकोनातून आरटीओ, वाहतूक आणि महामार्ग पोलिसांकडून सातत्याने जनजागृती आणि प्रबोधन केले जाते. तरीसुद्धा वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत.
या सर्व दृष्टिकोनातून परिवहन विभागाकडून भरारी पथकाच्या माध्यमातून नुकतीच मोहीम राबवण्यात आली. एक हजार 16 वाहनांवर कारवाई करण्यात आली. वेगाने वाहने चालविणे, लेन कटिंग, सिटबेल्ट, प्रवेश निषेध असताना प्रवेश करणे, मोबाइलवर बोलणे, वैध कागदपत्रे नसने, ओव्हरलोड, क्षमतेपेक्षा जास्त मालवाहू नेणे अशा वाहनचालकांवर आरटीओकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांच्याकडून 23 लाख 71 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मागील महिन्यांपासून द्रुतगती महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महामार्गाच्या वेगावर नियंत्रण महत्त्वाचे आहे. वेगमर्यादा व लेन कटिंगचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाईमुळे अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत होणार आहे. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवल्यास व लेन कटिंगचा मोह टाळल्यास अपघातांचे प्रमाण निश्चित मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे मत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी केले.
द्रुतगती महामार्गावरील अपघात कमी करण्यासंदर्भात दंडात्मक कारवाईचा सुरू केल्याने वाहनांची वेग मर्यादा ताशी 100 आणण्यात यश आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली असल्याचेही पाटील म्हणाले.
रस्त्यावर आजपर्यंत अनेक अपघात हे नियम मोडणार्या बेशिस्त वाहन चालकांमुळे झाले आहेत. अशा अपघातांना आळा बसण्यासाठी वाहतूक शाखेकडून अनेक वेळा समजविले जाते. आवाहनही केले जाते, मात्र पुन्हा चूका होतात. त्यामुळे पोलिसांना कारवाई करणे भाग पडते.
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
उरण वाहतुक शाखेने नियम मोडणार्या बेशिस्त वाहन चालकांवर 15 दिवसांत 2247 जणांवर दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती वाहतुक उरण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी दिली. रस्त्यावर अनेक अपघात हे नियम मोडणार्या बेशिस्त वाहन चालकांमुळे झाले आहेत.
उरण शहरातील वैष्णवी हॉटेल ते राजपाल नाका, उरण चारफाटा ते राजपाल नाका, कोट नाका ते राजपाल नाका या ठिकाणी ही कडक दंडात्मक कारवाई करण्यात आली. उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे, यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार निता डाऊर, पोलीस नाईक सिद्धादेन कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश घोडके व सिडको वार्डन आदी या कारवाई मोहिमेत सहभागी होते.
1 ते 15 जुलैदरम्यान उरण वाहतूक शाखेकडून उरण तालुक्यात एकूण 2247 जणांवर दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दुचाकी, चारचाकी चालकांवर, रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्किंग करणार्यावर, हेल्मेट नसणे, विना लायसन्स, ट्रिपल सीट, नंबर प्लेट अशा एकूण 1117 वाहनांवर कारवाई केली आहे. अन्य कारणांनी चारचाकी सहाचाकी आणि अवजड 1035 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. ओव्हर सीट लायसन्स अशा अन्य कारणांनी 95 रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. अशा एकूण 2247 वाहनांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी दिली आहे.