Breaking News

राजकीय सुडाचा आरोप करणार्यांना चपराक

देशमुखांच्या जप्ती कारवाईप्रकरणी दरेकरांनी ‘मविआ’ला सुनावले

मुंबई : प्रतिनिधी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालकीच्या चार कोटी 20 लाख रुपये किंमतीच्या दोन मालमत्तांवर शुक्रवारी ईडीने जप्तीची कारवाई केली. या कारवाईनंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अनिल देशमुख यांच्यावरील मालमत्ता जप्तीच्या कारवाईवरून राज्यातील सत्ताधार्‍यांना परखड शब्दांमध्ये सुनावले आहे. ही कारवाई म्हणजे राजकीय सूडाचा आरोप करणार्‍यांना चपराक आहे, अशा शब्दांत प्रवीण दरेकर यांनी राज्यातील तिनही सत्ताधारी पक्षांवर टीकास्त्र सोडले आहे.

अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता आरोप करणार्‍यांचं समाधान होईल, असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. राजकीय सूडापोटी केंद्र सरकार आणि एजन्सी काम करतायत असं बोलणार्‍यांना ही चपराक आहे. जर तपासात मालमत्ता जप्त झाली, याचा अर्थ त्या तपासात तथ्य आहे. अशा कोणत्याही यंत्रणेला मनमानी करता येत नाही. आता भाजपवर, केंद्रावर आणि तपास यंत्रणांवर आरोप करणार्‍यांचे समाधान होईल. आता या प्रकरणात सत्यता असल्याचे दिसून आले आहे. भविष्यात यातील तथ्य आणि सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

दरम्यान, अनिल देशमुखांवरील जप्तीच्या कारवाईप्रकरणावरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कारवाईचा एकूण आकडा 100 कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा दावा केला आहे.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ईडीने याआधीच अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापे टाकल्यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. त्यासोबतच त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलालादेखील चौकशीसाठी ईडीनं समन्स बजावले असताना आता त्यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. अनिल देशमुख यांची चार कोटी 20 लाख रुपये किंमतीची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ही मालमत्ता अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची आहे. मुंबई आणि नागपूरमधील ही मालमत्ता असल्याची माहिती मिळत आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply