खालापूर, खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात सायमाळच्या वरच्या बाजूस शुक्रवारी (दि. 27) दुपारी निसान टेरानो या कारने अचानक पेट घेतला. त्यावेळी कारमध्ये सात प्रवासी होते. त्यात बहुतांश महिलाच होत्या, त्यातील आजीबाईंना तातडीने बाहेर काढण्यात आल्यानंतर सर्व प्रवासी सुखरूप होते. पण, डोळ्यादेखत कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्याचबरोबर महामार्गाला लागून असलेल्या डोंगराच्या सुक्या गवतानेही पेट घेतला.
पनवेल तालुक्यातील विचुंब गावातील सात भाविक शुक्रवारी निसान टेरानो कारमधून कार्ले येथे एकविरा आईच्या दर्शनासाठी जात होते. दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान बोरघाटातील सायमाळ गावाच्या वरच्या बाजूस कारने अचानक पेट घेतला.
या घटनेचे वृत्त समजताच अग्निशामक दल, आयआरबी यंत्रणा, देवदूत, अपघातग्रस्त मदत टीम, महामार्ग व खोपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र आग विझेपर्यंत कारचा कोळसा झाला होता.
वित्तहानी झाली मात्र, जीवितहानी सुदैवानी झाली नाही, या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ रोखावी लागली.