Breaking News

18 वर्षांखालील कोरोना लसीकरण लवकरच होणार सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम आता जोर धरू लागली आहे. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण तर वेगात सुरू आहेच, मात्र आता 18 वर्षांखालील वयोगटाचे लसीकरणही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. सध्या देशात 18 वर्षांखालील मुलांवर लसीच्या चाचण्या करण्यात येत आहेत आणि त्या आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.

केंद्र सरकारने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाला याबद्दलची माहिती दिली. 18 वर्षांखालील वयोगटावर सध्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत, मात्र त्या लवकरच पूर्ण होतील. त्या पूर्ण झाल्या आणि तज्ज्ञांनी लसीकरणाची मान्यता दिली की लगेचच 18 वर्षांखालील वयोगटाच्या लसीकरणासाठीचे नियोजन करण्यात येईल आणि या लसीकरण मोहिमेलाही लगेचच सुरुवात करण्यात येईल, असे केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले.

12 ते 18 वयोगटातल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस द्यावी अशी याचिका एका 12 वर्षीय बालकाने आपल्या आईच्या माध्यमातून आणि एका 8 वर्षांच्या मुलाच्या आईने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेला उत्तर देताना केंद्र सरकारने ही माहिती दिली आहे. सरन्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंग यांच्या विभागीय खंडपीठाने सांगितले की, संपूर्ण देश लहान मुलांसाठीच्या लसीकरणाची वाट पाहत आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला अजून थोडा वेळ दिला असून पुढील सुनावणी 6 सप्टेंबरला होणार असल्याचे आदेश दिले आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply