Breaking News

व्हॅली क्रॉसिंग आणि साहसी खेळ

माथेरान हे जगाच्या पाठीवर असे थंड हवेचे ठिकाण आहे की येथे पर्यटक पाहुणे म्हणून आले तर या ठिकाणी राहणार्‍यांना दोन वेळचे जेवण मिळू शकते. पर्यटक आले तर पर्यटन होईल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल. कोणत्याही प्रकारची शेती नसलेल्या माथेरानमध्ये पर्यटनावर सर्वकाही अवलंबून आहे. पर्यटकांवर अवलंबून असलेली जगात अनेक राष्ट्र आहेत, पण 100 टक्के पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेले माथेरान हे जगाच्या पाठीवर एकमेव असे थंड हवेचे ठिकाण असेल. त्यामुळे पर्यटक आले नाहीत तर येथील जनतेवर उपासमारीची वेळ येते. हे चित्र दीडशे-पावणे दोनशे वर्षे आहे कायम आहे. माथेरानमध्ये कोणतीही वस्तू पिकवली जात नाही आणि बाहेरून आणलेल्या पदार्थांपासून चिक्की, चपला बनविल्या जातात, पण माथेरानमध्ये 100 टक्के उत्पादन होणारी एकही वस्तू नाही. ही बाब लक्षात घेऊन माथेरानकर वेगवेगळ्या स्वरूपात रोजगार शोधत असतात आणि त्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

काही तरुणांनी माथेरानची माहिती देणारे गाइड म्हणून काम सुरू केले आहे, तर काही पर्यटकांच्या बॅगा वाहून नेण्याचे कामदेखील करतात. कोणत्याही कामाला लाज बाळगायची नसते ते माथेरानमध्ये स्पष्टपणे जाणवते. काही तरुण हातरीक्षा ओढतात. काही सरकारी कामासाठी, घर बांधकाम करण्यासाठी लागणारे दगडदेखील वाहून नेत असतात. माथेरानमध्ये पर्यटकांना काय हवे आहे हे जाणून पर्यटनवर आधारित व्यवसायांना माथेरानकरांनी आपलेसे केले आहे.त्यातून गिर्यारोहणाची आवड असलेल्या काही तरुणांनी व्हॅली क्रॉसिंगचा पर्यटकांना चित्तथरारक अनुभव देणारा व्यवसाय निवडला. खरे तर हा वेगळा व्यवसाय माथेरानकरांनी पहिल्यांदा येथील जंगलात सुरू केला नाही. पनवेल आणि कर्जत येथील गिर्यारोहण करणारे काही तरुण माथेरानमध्ये येऊन दोराच्या साह्याने एका मोठ्या दरीमधील अंतर पार करणारा साहसी खेळांचा व्हॅली क्रॉसिंग प्रकार सुरू केला. त्या वेळी माथेरानमधील तरुणांनी अपघात झाल्यास कसे होणार असा विचार करून या नवीन व्यवसायाकडे दुर्लक्ष केले होते, परंतु बाहेरून येऊन व्यवसाय करणारे तरुण पाहून माथेरानमधील तरुणदेखील या व्यवसायात उतरले आणि जंगलाची पूर्ण माहिती असल्याने माथेरानमधील तरुणांनी सुरू केलेल्या झिप लाइन म्हणजे व्हॅली क्रॉसिंग व्यवसायाला मोठा प्रतिसाद मिळू लागला, मात्र माथेरानच्या जंगलावर मालकी असलेल्या वन विभागाने व्हॅली क्रॉसिंगचे सर्व दोर मोठा बंदोबस्त मागवून तोडून टाकले आणि हा व्यवसाय बंद झाला. माथेरानमधील पर्यटनाला चालना देणारा हा व्यवसाय बंद झाल्याने साहसी खेळांसाठी येणारे पर्यटकही कमी झाले.

गेल्या काही वर्षांत व्हॅली क्रॉसिंग आणि साहसी खेळ यांचे पर्यटन सुरू व्हावे यासाठी माथेरानमधील राजकारणी, नगर पालिका आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला. वन विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागून झाली. माथेरानवर नियंत्रण असणारी माथेरान सनियंत्रण समिती आणि टास्क फोर्सकडे व्यवसाय करणारे आपली आर्जव घेऊन पोहचले.विधिमंडळ अधिवेशनात माथेरानमधील व्हॅली क्रॉसिंगचा विशेष चर्चेला आला, पण सुरक्षितता या एकमेव विषय पुढे येत असल्याने माथेरानमध्ये पर्यटन व्यवसायात साहसी खेळ पुनः सुरू होत नव्हते.           

माथेरानमध्ये पर्यटन हा एकमेव व्यवसाय असल्याने पर्यटकांसाठी जंगल भागात दोन डोंगर, तलावांच्या दोन बाजू यांना झिप लाइन म्हणजे व्हॅली क्रॉसिंगद्वारे जोडण्याचा व्यवसाय केला जात होता. या साहसी खेळांना पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता, मात्र वन जमिनीवर वसलेल्या माथेरानमध्ये सुरू असलेल्या साहसी खेळांना शासनाची परवानगी नाही, म्हणून माथेरानच्या जंगलात विविध 13 ठिकाणी साहसी खेळांसाठी लावलेले दोर (रोप) वन विभागाने मोठा फोजफाटा बोलावून तोडून टाकले होते. त्यामुळे पर्यटकांचे आवडीचे साहसी खेळ पुन्हा सुरू करावेत अशी मागणी सातत्याने होत होती.त्यानंतर माथेरानमधील सर्व राजकीय पक्षांनी वरिष्ठ वन अधिकार्‍यांची भेट घेऊन येथील पर्यटन व्यवसाय लक्षात घेऊन परवानगी देण्याची मागणी केली होती, मात्र वन विभागाने अपघातांची शक्यता आणि व्यवसाय करण्यासाठी जबाबदारी कोणी घ्यायची, असा प्रश्न उपस्थित केला होता. हा मुद्दा माथेरान नगर परिषदेकडून राज्य सरकारपर्यंत नेण्यात आला होता, अखेर स्थानिकांचा आग्रह आणि सर्वपक्षीय दबाव पाहून सरकार नमले आणि  राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता देण्यात आली आहे.

नव्या धोरणानुसार राज्यात साहसी पर्यटन आयोजित करणार्‍या आयोजकांना पर्यटन संचालनालयाकडून प्रथम तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र आणि आवश्यक सर्व अहर्ता प्राप्त केल्यानंतर अंतिम नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल. साहसी पर्यटन आयोजकांनी पर्यटकांचा सुरक्षतेबाबत धोरणात नमूद केलेल्या तरतुदीनुसार दक्षता घेणे आवश्यक राहील. साहसी पर्यटन धोरणाचा परिणामकारक अंमलबजावणीकरिता राज्यस्तरीय समिती आणि विभागीय स्तरावर समित्या गठित केल्या आहेत. या समित्यांमध्ये जमीन, हवा आणि जल पर्यटनातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असेल. साहसी पर्यटन उपक्रम सुरक्षित व शिस्तबध्दरित्या आयोजित करण्यासाठीच्या शासनाने नियोजन केले आहे. माथेरान या पर्यटनस्थळावर पर्यटकांच्या आवडीचे साहसी खेळ आणि व्हॅली क्रॉसिंगसारखे पर्यटन खेळ लवकरच सुरू होणार आहेत.

व्हॅलीक्रॉसिंग

माथेरानमधील लुईजा पॉईंटपासून एको पॉईंट जोडणारा रोप पर्यटकांच्या सर्वांत आवडता व्हॅली क्रॉसिंग पॉईंट समजला जातो. त्याचवेळी एको पॉईंट ते हनिमून पॉईंट हा ट्रेकदेखील पर्यटकांच्या आवडीचा आहे. माथेरानला पाणीपुरवठा करणार्‍या शॉरलेट लेक तलावात एका तीरावरून दुसर्‍या तीरावर पोहचण्यासाठी रोप बसविला जातो. पाण्याच्या वरून जाण्याचा चित्तथरारक अनुभव माथेरानमध्ये पर्यटक घेत होते. त्याचवेळी अलेक्झांडर पॉइंट, रामबाग पॉइंट, लिटिल चौक पॉइंट, खंडाळा पॉइंट, हनिमून पॉइंट आदी ठिकाणी साहसी खेळांचा थरार अनुभवास मिळत होता.

65 कुटुंबांचा रोजगार हिरावला

माथेरानमधील विविध 13 ठिकाणी व्हॅली क्रॉसिंगच्या माध्यमातून पर्यटकांना साहसी खेळ उपलब्ध करून देणारी 65 कुटुंब माथेरानमध्ये आहेत. एका साहसी खेळाच्या ठिकाणी किमान चार ते पाच कुटुंबांतील तरुणांची आवश्यकता असते. दोन डोंगरांच्या दोन्ही बाजूला रोप बांधण्यापासून ते पर्यटन दरी एक बाजूने दुसर्‍या बाजूला गाठत असताना त्यांना सुरक्षित ठिकाणी नेऊन बेल्ट काढणे, रोप तपासून घेणे आदी कामे ते करून घेत असतात. साहसी खेळांचे थरार हे एक व्यक्ती करू शकत नाही. त्यामुळे शहरातील काही कुटुंब हा व्यवसाय एकत्र येऊन करीत असतात. साहसी खेळांवर बंदी आल्यानंतर मात्र त्या 65 कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply