Breaking News

‘आंबोली’ भागविणार मुरूडकरांची तहान

सुमारे 29 कोटी रुपये खर्च करून मुरूड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत हद्दीत आंबोली धरण बांधण्यात आले. आंबोली धरणात प्रचंड पाणीसाठा असून तीन डोंगरांच्या मधोमध हे धरण बांधल्यामुळे पावसात मोठ्या प्रमाणात पाणी सिंचन होऊन लोकांना येथून मुबलक पाणीपुरवठा होत असतो. मुरूड शहराला या धरणामधूनच पाणीपुरवठा झाल्याने मे अखेर असणारी पाणीटंचाई संपुष्टात आली आहे.

मुरूड तालुका हा नवाब कालीन तालुका असून येथे नवाबाची सत्ता होती. या वेळी मुरूड शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी नवाबांनी बांधलेले गारंबी धरण हा शहराला एकमेव आधार देणारे धरण होते. सुरुवातीला या शहराची लोकसंख्या फक्त सात हजार होती, परंतु आता हीच लोकसंख्या 16 हजाराच्या वर पोहचली असून येथे सलग सुट्ट्या पडल्यामुळे येणारे हजारो पर्यटक व त्यांना लागणारे पाणी ही खूप मोठी गंभीर समस्या आंबोली धरणामुळे आता संपुष्टात आली आहे.

ज्या वेळी गारंबी धरणाचे पाणी उपलब्ध होते. त्या वेळी सदरचे धरण हे खूपच छोटे असल्याने मे महिन्यातच पाणी अपुरे पडत होते. अशा वेळी शहरातील लोकांना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी खूप दूरवरून पायपीट करावी लागत होती, तसेच पर्यटकांनासुद्धा पाण्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत होता, परंतु महाराष्ट्र शासनाने याची गंभीर दखल घेत आंबोली धरणासाठी मान्यता दिल्याने या जलसाठ्यामुळे हजारो लोकांचा पाणीप्रश्न सुटला असून मुबलक पाण्यामुळे खूपसे क्षेत्र जल सिंचनाखाली येऊन सुमारे 500 हेक्टरपेक्षा जास्त जमिनी ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे.

आज या आंबोली धरणामुळे हजारो पर्यटक पावसाळी हंगामात या धरणाला भेट देऊन पाण्यात पोहण्याचा आनंद लुटत असतात. या धरणामुळे मुरूडला येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊन स्थानिकांना रोजगार मिळण्यास मदत झाली आहे. सदरचे धरण लघु पाटबंधारे खात्यांतर्गत येत असून या धरणाची सर्व सुरक्षा या खात्याच्या ताब्यातच येत आहे.

मुरूडमध्ये वर्षाला येणार्‍या पर्यटकांची संख्या पाच लाखापेक्षा जास्त असून पावसाळ्यात किमान 50 हजारपेक्षा जास्त पर्यटक शनिवार रविवार या दिवशी येथे पाहावयास मिळतात. त्यामुळे पावसाळी हंगामात आंबोली धरण हे पर्यटकांचे आकर्षण स्थळ म्हणून सर्वत्र सुपरिचित झाले आहे.

आंबोली धरण ज्या वेळी पावसाळ्यात ओव्हरफ्लो होते. त्या वेळी धरणातील पाणी जाण्यासाठी जो वेगळा मार्ग बनवला आहे तेथून ते पाणी एका चौकोनी हौदात साठून त्या पाण्याचा निचरा होत असतो. साठलेल्या या चौकोनी हौदात असंख्य महिला व पुरुष पोहण्याचा आनंद लुटत असतात. पर्यटकांना आकर्षित करण्याबरोबरच या धरणापासून किमान 10 किलोमीटर परिसरात असणार्‍या गावांना सुद्धा पाणीपुरवठा होऊन काही निवडक कालव्यांद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने या भागातील काही शेतकरी दुबार शेतीसुद्धा करीत असतात. एकंदर या धरणामुळे पर्यटन व स्थानिक शेतकरी याना मोठा दिलासा मिळून सुमारे 50 हजार लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे.

या धरणातील पाणी असलेल्या कालव्यांद्वारे सोडण्यात यावे जेणेकरून जिथपर्यंत कालवे आहेत तिथपर्यंत हे पाणी जाऊन जमीन ओलिताखाली येऊ शकते, तसेच पाण्याचा निचरा होऊन जास्तीत जास्त पाणी जमिनीत जिरले जाईल व त्याचा फायदा कोरडे पडलेल्या विहिरी व कूपनलिका यांना पाणी उपलब्ध होईल. यासाठी आंबोली धरणातील पाणी सोडावे, अशी मागणी येथील काही शेतकर्‍यांनी केली आहे, तसेच नवीन कालवे काढण्यात येऊन या धरणाचे पाणी माझेरी, खोकरी, शीघ्रे, तेलवडे, वावडुंगी या मोठ्या ग्रामपंचायतींना पोहचवण्यात येऊन येथील जल सिंचन मर्यादा वाढवण्यात आल्यास येथील शेतकरीसुद्धा दुबार पीक घेण्याचा आनंद घेऊ शकतात. यासाठी येथील असंख्य शेतकर्‍यांनी जलसंपदा मंत्री यांना निवेदन देऊन कालव्यांची कामे पूर्ण करण्याची विनंतीसुद्धा केली आहे. कालव्यांची कामे पूर्ण झाल्यास मुरूड तालुक्यातील बहुतांशी क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. शेती क्षेत्राचे उत्पन्न वाढवण्याबरोबरच आंबोली धरणामुळे पर्यटकांची संख्या वाढवण्यास मदतीचा हात दिला आहे.

आज स्थानिक शेतकरी या धरणातील पाण्यामुळे टोमॅटो, फ्लावर, कोबी, मिरची, कोथंबिर, कांदा, वालाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, चहा पत्ती, नारळ, सुपारी, आंबा, कलिंगडे आदी महत्त्वाची पिके घेऊन येथील शेतकरी सधन होताना दिसत आहे, तसेच पर्यटकांमुळे या भागातील छोट्या छोट्या टपर्‍या, खानावळ व हॉटेल हा धंदासुद्धा तेजीत आला आहे. एका धरणामुळे स्थानिक शेतकरी यांच्याबरोबर पर्यटनाला चालना मिळून लोकांना आर्थिक सुबत्ता मिळून लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावलेला दिसून येत आहे.

-संजय करडे, खबरबात

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply