अलिबाग : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील बोकडवीरा येथे सुरू असलेल्या 19 वर्षांखालील मुलांच्या रायगड जिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत उरण व अलिबाग संघांनी विजयी सलामी दिली. उरण स्पोर्ट्स असोसिएशन आणि यू. व्ही. पनवेल यांच्यात झालेल्या सामन्यात उरणने 118 धावांनी विजय मिळवला, तर अलिबागने उरणच्या धीरज क्रिकेट क्लबचा पराभव केला.
उरण अणि पनवेल यांच्यात झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना उरणने 40 षटकांमध्ये सर्व गडी गमावून 176 धावा केल्या होत्या. साईराज काळे याने 46, तर ॠषिकेश यावदव याने 29 धावा केल्या. पनवेलच्या विपूल पाटीलने 33 धावांत 4 बळी घेतले. मधूर पांढरे याने दोन गडी बाद केले. पनवेलचा डाव 24.2 षटकांमध्ये 58 धावांमध्ये आटोपला. उरणच्या तनिष्क गावी याने 18 धावांत तीन गडी बाद केले. वरूण म्हात्रे, कृतज्ञ मढवी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. 18 धावा व दोन गडी बाद करणारा कृतज्ञ सामनावरी ठरला.
अलिबाग क्रिकेट असोसिएशन व धीरज क्रिकेट क्लब यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना धीरज क्रिकेट क्लबचा डाव 17.1 षटकांमध्ये 51 धावांत संपुष्टात आला. अलिबागच्या राहूल नवखारकर याने भेदक गोलंदाजी करून अवघ्या तीन धावा देऊन पाच गडी बाद केले. स्वप्नील हिरवे याने दोन बळी घेतले. अलिबागने 1 गड्याच्या मोबदल्यात 52 धावा करून हा सामना
जिंकला. पाच बळी टिपणारा राहुल सामनावीर ठरला.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन, उरण क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन व दी नाई यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा अयोजित करण्यात आली आहे. बोकडवरी येथे खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत 16 संघ सहभागी झाले आहेत. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्योपाध्यक्ष जयंत नाईक व उपाध्यक्ष प्रकाश पावसकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मनीष टिपणीस, अरविंद राजपूत, जॉनी अॅनथॉनी, करीट पाटील, प्रशांत माने, सचिन म्हात्रे, समन्वयक सुयोग चौधरी, पंच सुहास हिरवे, सागर काटकर, ॠषिकेश पिंगळसकर आदी यावेळी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उरण स्पोर्ट्सचे किरीट पाटील, प्रशांत माने, सचिन म्हात्रे आणि त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत.