Breaking News

महाविकास आघाडीच्या मोर्च्याचा बोजवारा

नागरिकांनी फिरवली पाठ

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल उरण महाविकास आघाडीतर्फे मालमत्ता कराविरोधात सोमवारी (दि.13) काढण्यात आलेल्या मोर्चाला शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांनी अक्षरशः पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पाच हजारांपेक्षा हजारापेक्षा जास्त नागरिक मोर्चाला उपस्थित राहतील, अशी वल्गना केली होती, मात्र पोलिसांच्या माहितीनुसार, प्रत्यक्षात केवळ 800 ते हजार नागरिक उपस्थित होते. त्यामुळे हा मोर्चा खर्‍या अर्थाने सपशेल अपयशी ठरला आहे.
या मोर्चात महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने निवेदन देण्यासाठी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेतली. या वेळी आयुक्तांनी शासनाची व महापालिकेची बाजू ठोसपणे मांडल्यामुळे शिष्टमंडळाची गोची झाली व यातूनच शासन आणि महापालिका नागरिकांना दिलासा देण्याबाबत किती सकारात्मक आहे हे दिसून आले.
मोर्चाची सांगता करताना काही पुढार्‍यांनीही आपल्या भाषणात या मुद्द्याचा उल्लेख करून महापालिकेची बाजू मांडली. तत्पूर्वी मालमत्ता कराबाबत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांची घेतलेली भेट कामी आली असून त्यामुळेच नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
दरम्यान वक्त्यांनी नेहमीचेच बिनबुडाचे आरोप केल्याने उपस्थित नागरिकांनी वडापाव खाण्यात आणि पाणी पिण्यातच धन्यता मानली, तर अनेकांनी सेल्फी काढून सोशल मीडियावर आपली उपस्थिती दाखवत मोर्चातून काढता पाय घेतला. प्रशांत पाटील यांच्या नेहमीच्या रटाळ भाषणामुळे व्यासपीठावरील महाविकास आघाडीच्या पुढार्‍यांनीही व्यासपीठावरून पळ काढला. मोर्चाच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता, मात्र नागरिकांपेक्षा पोलिसांचीच उपस्थिती अधिक दिसून आली. भाषणांवेळी पुढार्‍यांनी मालमत्ता कराविषयी मुद्दे मांडण्याऐवजी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यावरच भर दिला.
अस्वच्छता पसरविल्याने संताप
पनवेल महापालिकेने लाखो रुपये खर्च करून महात्मा गांधी उद्यानाचे सुशोभिकरण केले होते, मात्र महाविकास आघाडीने काढलेल्या मोर्चामुळे या उद्यानाला कचर्‍याचे स्वरूप आले होते. मोर्चेकर्‍यांनी ठिकठिकाणी अर्धवट खाल्लेले वडापाव, रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांचा खच दिसून आल्याने पनवेलकर संतप्त झाले असून त्यांनी महाविकास आघाडीचा निषेध केला आहे. एकंदरीत पाहता हा मोर्चा पूर्णपणे फेल झाल्याचे चित्र दिसून आले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply