मुरुड : प्रतिनिधी
तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, आठ दिवसात तब्ब्ल 1342 मिलीमीटर पाऊस कोसळला. आतापर्यंत मुरुड तालुक्यात एकूण 2563 मिलीमीटर पाऊस झाला असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुरूड-अलिबाग रस्त्यावरील काशीद पूल कोसळल्यामुळे मुरुडहून अलिबाग, पनवेल, मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद आहे. या मुख्य रस्त्यावरील सर्व वाहतूक भालगाव व सुपेगाव मार्गे सुरु आहे. तालुक्यांक्यातील अनेक पूल खिळखिळे झाले आहेत.काशीद ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील चिकणी येथील पूल कमजोर झाला आहे. पाण्याच्या वेगामुळे पुलाखालील माती वाहून गेली आहे. त्यामुळे पुलाच्या एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर हा पूलसुद्धा खचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विहूर पुलाचीसुद्धा बिकट अवस्था असून पुलाचे संरक्षक कठडे खाली पडले आहेत. त्यामुळे हा पूलसुद्धा वाहतूकीसाठी धोकादायक झाला आहे. संततधार पावसामुळे मुरुड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजपुरी, खारीकवाडा, नांदगाव, उसरोली, आदाड, बोरलीनाका आदी भागात अतिवृष्टीमुळे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी एका दिवसात 270 मिलीमीटर एवढा विक्रमी पाऊस झालो. या पावसामुळे राजपुरी कोळीवाड्यातील चार घरावर दरड कोसळल्यामुळे आठ कुटुंबाला अन्य ठिकाणीं तात्काळ हलवण्यात आले आहे. शेतांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. लावणीयोग्य झालेले राब पाण्याखाली गेल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. नद्या, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत.