माणगाव : प्रतिनिधी
तालुक्यात बुधवार (दि. 21) ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवानी एकमेकांना गळाभेट देत बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हिंदू बांधवांनीही मुस्लिम बांधवांची घरोघरी भेट घेऊन तसेच दूरध्वनीवरून बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही मुस्लिम बांधवानी प्रशासनाने घालून दिलेले निर्बंध व नियमांचे पालन करीत ईद साजरी केली. बुधवारी सकाळी मशिदीत मौलाना व मोजक्या लोकांनी ईदची सामुदायिक नमाज अदा केली. तर अनेक मुस्लिम बांधवांनी घरातूनच ईदची नमाज अदा केली. तालुक्यातील माणगाव, जुने माणगाव, नाणोरे, लोणशी, मोर्बा, निजामपूर, दहिवली, दहिवली कोंड, तारणा, वडवली, साई, मांजरवणे, गोरेगाव, टेमपाले, लाखपाले, वणी, पुरार, हारकोळ आदी मुस्लिमबहुल गावांत बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी माणगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.