पनवेल ः बातमीदार
नामदेव शिंपी समाज युवक संघातर्फे दिला जाणारा शिंपी समाजात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभ ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाला. 15 ऑगस्ट रोजी पनवेलचे सुपुत्र हिरवे गुरुजी हे गोवा मुक्तिसंग्रामात भारतीय स्वातंत्र्यलढ्यात शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी नामदेव शिंपी समाज युवक संघ, महाराष्ट्र यांच्या वतीने विशेष उल्लेखनीय कामगिरी करणार्या समस्त शिंपी समाजातील एका समाजरत्नास हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात येते. इचलकरंजी येथील अवकाश संशोधक, वैज्ञानिक प्रसन्न वायचळ यांना यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शासकीय निर्बंधांमुळे 15 ऑगस्ट रोजी सदर कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे ठरले. अचूक निर्धारित वेळेत दुपारी 4 वाजता ऑनलाइन सुरू झालेल्या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन भोसरी, पुणे येथून सागर हिरवे यांनी केले. अॅड. सागर मांढरे यांनी पुणे येथून कार्यक्रमाची प्रस्तावना केली. हिरवे गुरुजी यांच्या मोठ्या सून अरुणा हिरवे तसेच नातसून सुरेखा हिरवे आणि हेमलता हिरवे यांनी हिरवे गुरुजी आणि संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.