Wednesday , February 8 2023
Breaking News

पोलादपुरात सावित्री नदीचे पाणी रस्त्यावर

पोलादपूर ः प्रतिनिधी
शहरात बुधवारी (दि. 21) सायंकाळी उत्तरवाहिनी सावित्री नदी यंदा प्रथमच रस्त्यावर आली. याचदरम्यान रानबाजिरे येथील एमआयडीसीचे धरण धोक्याच्या पातळीच्या अगदीच जवळ भरून वाहू लागले असल्याने सर्व आपत्कालीन यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
पोलादपूर तालुक्यात बुधवारी सकाळी संपलेल्या 24 तासांतील पावसाची नोंद केवळ 64 मिमी असताना दुपारनंतर पावसाने मुसळधार हजेरी लावली. अशात तालुक्यातील गोळेगणी ते कोतवाल, कुडपण व ओंबळी भागासह पळचिल, कोंढवी, भोगाव, धामणदिवी येथून येणारी चोळई; कापडे खुर्द, चांभारगणी, कापडे बुद्रुक येथील घोडवनी, देवळे भागातून ढवळी तर कामथे बोरघर भागातून कामथी नद्यांच्या परिसरात जोरदार पाऊस पडल्याने सर्व नद्यांचे पाणी सावित्री नदीला येऊन मिळाले. यामुळे सावित्री नदीपात्राच्या पूरस्थितीत वाढ होऊन पोलादपूरनजीक रानबाजिरे येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाच्या धरणाची पातळी सायंकाळी 57.60 मीटर एवढी वाढली. या धरणाची धोक्याची पातळी 58 मीटर असल्याने प्रशासन तसेच पोलिसांनी सर्व आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासाठी आदेश दिले आहेत.
शहरातील उत्तरवाहिनी सावित्री नदीचे पात्र गंगामाता घाटावरील पहिल्या पायरीला लागले, तर त्यापुढे जुन्या महाबळेश्वर रस्त्यावर गणेश मंदिरासमोरील चरईकडे जाणार्‍या नदीपात्रातील
पायवाटेजवळ जुन्या पोस्ट ऑफिसजवळील स्मशान रस्त्यावर सावित्री नदी खळाळून वाहत होती.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply