पनवेल : प्रतिनिधी : कोरोनामुळे देशात मंगळवार मध्यरात्रीपासून कर्फ्यू लावण्यात आला. त्यामुळे आता अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल. स्वयंपाकचा गॅस मिळणार नाही, अशा अफवा पसरल्याने नवीन पनवेलमध्ये नागरिकांनी गॅस एजन्सीच्या समोर मोठ्या रांगा लावल्या आहेत. त्याठिकाणी कोणतीही सुरक्षा घेण्यात येत नव्हती.
नवीन पनवेलमध्ये सिडको कार्यालयाच्याजवळ एचपी आणि भारत गॅस कंपनीचे वितरक आहेत. स्वयंपाकाचा गॅस मिळणार नाही अशा अफवा पसरल्याने अनेक नागरिक रिकामे सिलिंडर घेऊन सकाळपासून या वितरकांच्या दारात रांगा लावून उभे होते. या ठिकाणी सुरूवातीला काही अंतरापर्यंतच चार-पाच बॉक्स करण्यात आले होते. त्यानंतर सगळे जवळ-जवळ रांगेत उभे होते.
याबाबत वितरकाला गॅस सिलेंडरची घरी डिलेव्हरी का करीत नाही असे विचारले असता आमच्याकडे माणसे नाहीत असे उत्तर देण्यात आले. ज्यांना तत्काळ सिलेंडर हवे त्यांनी येऊन घेऊन जावे असे त्या ठिकाणी सांगण्यात येत होते. तेथून स्कूटरवर धोकादायक पध्दतीने दोन-दोन सिलेंडर घेऊन नागरिक जात असल्याचे दिसत होते. गॅस सिलेंडर घरपोच देणे ही जबाबदारी वितरकाची असताना ती टाळण्यासाठी वितरक लोकांना सिलेंडर घेऊन जाण्यास सांगत असल्याचे अनेकांनी सांगितले. याबाबत पनवेलच्या पुरवठा खात्यात चौकशी केली असता त्यांनी आम्ही वितरकांना त्यांच्या कर्मचार्यांसाठी पास घेऊन जाण्यास सांगितले आहे, पण सर्वांनी ते नेले नाहीत. वितरकाने गॅस सिलेंडर ग्राहकांना घरी नेऊन द्यायचा आहे. तशा त्यांना सूचना देण्यात आल्याचे सांगितले.